रेल्वे प्रवाशांना लुटणारा यूपीचा मोस्ट वॉन्टेड आरोपी २४ तासात गजाआड –  दादर लोहमार्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई – २५ हून अधिक गुन्हे केल्याचे उघड 

808
            दादर,मुंबई : (सा.समाजशील वृत्तसेवा) – मुंबई – रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना लुटणाऱ्या उत्तर प्रदेशच्या सराईत गुन्हेगारास गजाआड करण्यात दादर लोहमार्ग पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले आहे. हा आरोपी मुंबईत लॉजमध्ये राहून प्रवाशांना लुटत होता. त्याने आतापर्यंत २५ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.  ७-८ प्रवशांना लुटल्यानंतर आरोपी पुन्हा यूपीला पळून जात होता अशी माहिती दादर लोहमार्ग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर काटकर यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
या बाबत ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च २०२१ रोजी पहाटे ५.३५ वाजण्याच्या सुमारास दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ७ वरून जनशताब्दी एक्सप्रेस सुटली. या एक्सप्रेसच्या बोगी क्र. डी/७ मधील खिडकीच्या जवळील आसनावर श्रीमती विमल लोकरे (६५) या बसल्या होता. दरम्यान माटुंगा रेल्वे स्थानकात येताच एक्सप्रेसचा वेग कमी झाला आणि हीच संधी साधून एका चोरट्याने विमल लोकरे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पळ काढला. काही कळण्यापूर्वीच चोरट्याने धूम ठोकली. दरम्यान, घडलेला प्रसंग विमल लोकरे यांनी दादर लोहमार्ग पोलिसांना सांगितला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी (गु. र. क्र. २१४/२०२१) भादंवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला.
वारंवार घडणा-या या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दादर लोहमार्ग पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले दादर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी तपासासाठी लोहमार्ग पोलिसांचे एक विशेष पथक नेमले. तपासादरम्यान हाती लागलेल्या तांत्रिक माहितीनुसार विशेष दादर लोहमार्ग पोलीस पथकाने आरोपी चकनलाल बाबुलाल सोनकर (४४) याच्या मुसक्या आवळल्या. चकनलाल याची कसून चौकशी केली असता त्याने आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांचा पाढाच वाचून दाखवला. मूळचा उत्तर प्रदेश (यूपी) राज्यातील गोंडा येथील रहिवासी असलेला चकनलाल बाबुलाल सोनकर हा २००८ सालापासून मुंबई येत असून, कामाठीपुरा व मुंबई सेंट्रल परिसरातील लॉजमध्ये राहयचा. गर्दीच्या वेळी अथवा एक्सप्रेस, मेल अथवा लोकलने प्रवास करणाºया प्रवाशांचा ऐवज लुटत असल्याची कबुली आरोपी चकनलाल बाबुलाल सोनकर याने दादर लोहमार्ग पोलिसांना दिली. अशा प्रकारे चकनलाल याने अद्यापर्यंत २५ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपयांचे ३० ग्रॅमची चेन जप्त करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद, लोहमार्ग मध्य परिमंडळचे उपायुक्त मकानदार, सहाय्यक पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले दादर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक अ. दी. पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. डी. घनवट, हवालदार शिंदे, हवालदार लिंगाळे, हवालदार खरात, हवालदार हरिश्चंद्रे, हवालदार भडाळे, पोलीस नाईक टिंगरे, पोलीस अंमलदार पवार, पोलीस अंमलदार खैरनार, पोलीस अंमलदार आरकड, पोलीस अंमलदार परदेशी यांनी केला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *