जीवनातील संकटांवर यशस्वीपणे मात करीत लढणारा लढवैय्या   म्हणजे “अजय हिंगे पाटील

931
         शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक एखादं वादळ यावं, आणि सारं काही होत्याचं नव्हतं व्हावं, अशीच स्थिती झाली होती. अपघाताने कायमस्वरुपी अंथरुणाला खिळवून ठेवले होते. हताशपणे अंधारवाटेकडे डोळे लावलेले असतानाच आमदार अशोक बापू पवार यांच्यामुळे माझी अंधारवाट प्रकाशवाट झाली. इतकेच नाही, तर त्या प्रकाश वाटेवर पुन्हा नव्या जोमाने चालण्याची प्रेरणा आणि बळही त्यांनी मला दिले आहे. याबाबत त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.ही भावना, कृतज्ञता व्यक्त केली आहे ती जीवनातील भयानक संकटांवर यशस्वीपणे मात करीत लढणारा लढवैय्या,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया सरचिटणीस  “अजय हिंगे पाटील यांनी. पाहुयात त्यांच्याच शब्दातील त्यांचा जीवन संघर्ष.
  ” होय, मी आज स्वतः माझ्याविषयीच सांगतोय. मी अजयशेठ हिंगे, एक सामान्य घरातील सामान्य मुलगा!  राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस या नात्याने आपण बहुतेकजण मला ओळखत असालच. पण इथंपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी माझ्या पायात आणि मनातही बळ आणले, मी सुद्धा काही करू शकतो, मनात आणले तर आकाशालाही गवसणी घालू शकतो, हे ज्यांनी मला सांगितलं, पाठीवर हात ठेवून बळ दिलं, उभे राहण्यास आधार दिला, आणि तो आधार कायम असेलच याची खात्री दिली त्या खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब आणि आमदार अशोक बापू तसेच सुजाता भाभी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज स्वतः विषयी लिहायचे ठरवले आहे.
१५ वर्षांपूर्वी बारावी झाल्या त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी मध्ये एका ठिकाणी नोकरी लागली. सगळे काही सुरळीत सुरू होते. पण अचानक एक दिवस, म्हणजे २० जून २००६ रोजी जीवघेणा अपघात झाला; आणि सारेच संपले. तीन महिने पुण्याच्या बुधराणी रुग्णलायात उपचार सुरू होते. इतके दिवस उपचार करूनही मी पुन्हा उभा राहीन याची शाश्वती स्वतः डॉक्टरही देत नव्हते. मणक्याला गंभीर इजा झाली होती. कायमस्वरूपी झोपून रहावे हाच एक मार्ग सांगण्यात आला. हताश अवस्थेत छताकडे डोळे लावून पडून रहात होतो. किती दिवस असे हे असहाय आयुष्य जगायचे याचा विचार करत एक एक दिवस वर्षासारखा काढत होतो. त्यावेळी आमदार अशोक बापू पवार मला बघायला एक दिवस काका गोपाळराव हिंगे यांच्यासह आमच्या घरी आले. त्यांनी धीर दिला व रिकामे डोके सैतानाचे घर असते याची जाणीव करून दिली. त्यांनी नुकत्याच येऊ घातलेल्या सोशल मिडियामध्ये स्वतः ला गुंतवून घेण्याचा लाखमोलाचा सल्ला मला दिला व नंतर माझे सगळे जीवनच बदलून गेले.
बसल्या ठिकाणी निव्वळ आजारपणाचाच विचार डोक्यात आणि मनात येऊन आणखी खचून जाशील, तू उभा राहू शकतोस. आपण करू प्रयत्न, म्हणत बापूंनी  आधार दिला. लागलीच ते शब्द प्रत्यक्षात उतरवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया टीम मध्ये काम करण्याची संधी मिळवून दिली. आणि हळूहळू स्वतःचे दुःख विसरत पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जाणून घेत असताना मनाला उभारी येत गेली.एकीकडे बसल्या जागूनच असले तरी मनाला उभारी देणारे आणि समाधान वाटेल असे आयुष्य नव्याने सुरू झाले होते. एकाकीपण आणि अधुपणाचे दुःख मनातून हळूहळू पुसले जात होते. सुप्रियाताई सुळे यांच्या  माध्यमातून बारामती लोकसभा मतदार संघातील अनेक दिव्यांग बांधवांना आतापर्यंत आवश्यक ती साधने दिली गेली आहेत. माझे बंधुतुल्य मित्र सुदर्शन जगदाळे यांना ताईंनी ऑटोमॅटिक व्हीलचेअर दिली व त्यामुळे तब्बल चौदा वर्षानंतर सुदर्शन स्वतःच्या पायावर उभे राहू शकला. या गोष्टीचा आम्हा सर्वांना खूप आनंद झाला.
त्याच धर्तीवर मलाही ऑटोमॅटिक व्हीलचेअर मिळू शकते ही बाब शिरूर लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार डॉ. अमोल कोल्हे  साहेब यांच्या लक्षात आली, व लागलीच त्यांनी त्यांच्या टीमला कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर कोल्हे साहेब यांचे पीए नाना सावंत साहेब, ताईंच्या सोशल मीडिया टीमचे समन्वयक, स्टर्लिंग सिस्टिमचे संचालक  सतिश पवार सर यांच्यासह कोल्हे साहेबांच्या पूर्ण टीमने अथक प्रयत्न करून मला ही व्हीलचेअर मिळवून दिली. आवश्यक त्या शासकीय परवानग्या, कागदोपत्री पूर्तता करत व्हीलचेअर मागवून घेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगेच आहेत. खरोखर त्यांचे किती आभार मानले तरी ते कमीच पडतील.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया सेलचा सरचिटणीस म्हणून काम करताना आदरणीय खासदार सौ. सुप्रियाताईंशी अत्यंत जवळचा संबंध आला. ताई वेळोवेळी अत्यंत आपुलकीने फोनवर माझी चौकशी तर करतातच पण मौलिक मार्गदर्शनही करतात त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा मला प्राप्त होते. ताईंच्या या आपलेपणामुळे माझ्यासह सर्वच कार्यकर्त्यांमध्ये ताई आपली हक्काची ही भावना आणखी वृद्धिंगत झाली आहे.
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आदरणीय खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांच्या सोबत काम करताना  त्यांच्याशी जवळून संबंध आला. त्यावेळी अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्वाबरोबरच प्रेमळ मन असणाऱ्या खासदार साहेबांचा मी कधी झालो ते समजलेच नाही. आदरणीय खासदार सौ. सुप्रियाताईंच्या माध्यमातून माझे जवळचे मित्र श्री. सुदर्शन जगदाळे यांना ऑटोमॅटीक ॲंड स्टॅंडींग व्हीलचेअर मिळाल्यानंतर संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेबांनी देखील मला तशीच ॲटोमॅटीक ॲंड स्टॅंडींग व्हीलचेअर  देण्याचा शब्द दिला. नुसता शब्दच दिला नाही तर त्या अनुषंगाने त्यांच्या टीमकडून सर्व पूर्तता  करून घेतल्या आणि माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला व्हीलचेअर चे अनोखे गिफ्ट मला दिले.
माझ्या आयुष्याचा कळसाध्याय मानावा असा योग खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घडवून आणला आणि मी देखील आता तब्बल १५ वर्षांनंतर उभा राहू शकणार आहे.
आयुष्यभर झोपूनच राहणार असे जवळ जवळ निश्चित झालेल्या मला चक्क ही व्हीलचेअर वाढदिवसाची भेट म्हणून दिली. अक्षरशः माझा पुनर्जन्मच झाल्याचा भास त्या दिवशी झाला. कोण सोशल माध्यमातून, कोण फोन करून, तर कोणी प्रत्यक्ष भेटून मला शुभेच्छा देत असतात. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत असतात. त्याच वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेबांनी प्रत्यक्ष व्हीलचेअर भेट दिली आणि जणू सांगितले, अजयशेठ ‘नाऊ यू कॅन स्टँड’. मन अक्षरशः गदगदून आले होते. खासदार सुप्रियाताई सुळे, डॉ. कोल्हे साहेब, आमदार अशोक बापू यांनी खरोखर त्या दिवशी माझ्या पाठीवर हात ठेवून आयुष्याशी लढण्याचे बळ दिले. या बळाच्या जीवावर आणि त्यांच्या सहकार्याने आयष्यात कोणत्याही आव्हानासमोर छाती ठोकून मी उभा राहू शकतो, याचा विश्वास या सर्वांनी मला दिला आहे.
सोशल मीडियामध्ये काम करत असताना आम्हाला सातत्याने मार्गदर्शन व मदत करणारे सतीश पवार यांनी खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून सुदर्शन जगदाळे यांना व्हील चेअर मिळवून देण्यासाठी जेवढे प्रयत्न केले, तेवढेच प्रयत्न त्यांनी माझ्यासाठी सुद्धा केले आहेत. त्यासाठी मला त्यांचे खास आभार मानायचे आहेत. याशिवाय आवर्जून नमूद करावेसे वाटते की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया टीममध्ये काम करत असताना सुहास उभे , खासदार साहेबांचे पीए तेजस झोडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा सोशल मीडिया उपाध्यक्ष अमोल कावळे , आमदार अशोकबापू यांचे पीए प्रदीप जाधव,  राजेंद्र गिरमकर, योगेश इंगळे, खासदार साहेबांच्या सोशल मीडिया टीम मधील सागर जाधव, माझे बंधुतुल्य मित्र सुदर्शन जगदाळे या सर्वांचे मौलिक योगदान मिळत असते. या सर्वांचा मी सदैव आभारी आहे.
आता अगदी मनातली एक इच्छा, माझ्या वाढदिवसाला इतकी अनमोल भेट देणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेबांना मला या व्हील चेअरसोबत भेटायचं आहे. त्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करायची आहे; आणि सोबत एक सेल्फी पण घ्यायचा आहे. त्यामुळे अगदी आतुरतेने वाट पाहतोय, त्यांची. खासदार डॉ. कोल्हे साहेब, येताय ना भेटीस ..!!– शब्दांकन 
अजयशेठ हिंगे पाटील
सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *