बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी थोडक्यात बचावला – कवठे येमाईच्या गांजेवाडीतील घटना 

1331
              शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या गांजेवाडी परिसरात वास्तव्यास असलेले शेतकरी लहू म्हातारबा मेरगळ हे  पहाटे ३ च्या दरम्यान घरासमोर सूरु झालेल्या कुत्र्यांच्या भुंकण्याने जागे होऊन घराबाहेर बॅटरीच्या उजेडात पाहिले असता एक मोठा बिबट्या  खुराड्यात असलेल्या कोंबड्यांवर ताव मारीत असलेला पाहिला. या  बिबट्याला लहू यांनी कुत्र्याच्या सोबतीने हाकलण्याचा प्रयत्न केला असता गुरगुरणाऱ्या बिबट्याने थेट लहू मेरगळ यांच्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला.त्यांनी तात्काळ घरात जात दरवाजा बंद केला.तर याच बिबट्याने घराच्या दरवाज्यापर्यंत झेप घेत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे मेरगळ यांनी सा.समाजशीलशी बोलताना सांगितले. नशीब बलवत्तर म्हणून ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
           दरम्यान अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत लहू मेरगळ यांनी फोनवरून बाजूच्या शेतकऱयांना सावध केले. तर त्यांच्या पत्नी तुळसाबाई मेरगळ यांनी बिबट्या आपल्या पतीवर हल्ल्याच्या प्रयत्नात असल्याचे पाहून प्रचंड आरडा ओरडा केल्याने जवळील रामदास मेरगळ ,नितीन डोके,दादाभाऊ कांदळकर,बाबाजी मेरगळ व इतर शेतकऱयांनी तात्काळ मेरगळ यांच्या घराकडे मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान बिबट्याने अंधाराचा फायदा घेत बाजूच्या शेतातून धूम ठोकली.
            याच परिसरात अनेक बिबटयांचा संचार सुरूच असून पाळीव जनावरे त्यात शेळ्या,कोंबड्या,मेंढ्या,कुत्रे यांना ही बिबटे भक्ष करीत आहेत. शेतवस्तीवर राहणारे नागरिक पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत असून बिबट्यांच्या दहशतीने रात्री ७ नंतर कोणीच घराबाहेर किंवा शेतीस पाणी देण्यासाठी जात नसल्याचे मेरगळ यांनी सांगितले. वन विभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकऱयांनी केली आहे.
          दरम्यान या परीसरात तात्काळ पिंजरा लावण्याच्या शेतकऱयांच्या मागणीबाबत शिरूर वन विभागाच्या वनपाल चारुशीला काटे यांच्याशी संपर्क साधला असता शासकीय नियमानुसार योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *