पिंपरखेड येथे दिवसा बँकेवर दरोडा – सुमारे २ कोटी रुपयांचे सोने,३१ लाख रुपये लंपास 

346
                 शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भरदिवसा रिव्हॉल्व्हर चा धाक दाखवत पाच दरोडेखोरांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर दरोडा टाकून सुमारे २ कोटी किमतीचे सोने व ३१ लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना आज गुरुवार दि. २१ ला दुपारी दीडच्या दरम्यान घडली आहे. दरोड्याच्या या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिरूरच्या पश्चिम टोकाला असणाऱ्या पिंपरखेड येथे दिड वाजता तोंड बांधलेले पाच दरोडेखोर हातात रिव्हॉल्व्हर घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत घुसले. यावेळी बँकेतील कर्मचाऱ्यांना हाताने मारहाण करुन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत त्यांच्याकडून लॉकरच्या चाव्या घेतल्या आणि लॉकर मधील सर्वच सुमारे २ कोटी रुपयांचे सोने व ३१ लाख रुपयांची रोख रक्कम एका पोत्यात भरून बाहेरील सफेद रंगाच्या चार चाकी वाहनातुन पिंपरखेड गावातून वेगात गाडी घेऊन दरोडेखोर पसार झाले.
यावेळी कर्मचारी यांनी बाहेर येऊन आरडाओरडा केल्याने गावातील नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली. यावेळी या घटनेची माहिती शिरूर पोलिसांना मिळाल्यानंतर तत्काळ नाकाबंदी करण्यात आली.व्यवस्थापक मोहित चौहान, सागर पानमंद,गणेश खैरे,हरि काळे या कर्मचाऱ्यांना दरोडेखोरांनी मारहाण केली.शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी घटनास्थळी भेट घेऊन सीसीटीव्ही फुटेजची पहाणी करीत चौकशी सुरु केली आहे. दरम्यान काठापूर येथे एका हॉटेलमध्ये घुसून महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोने हिसकावून चोरुन नेल्याची घटना देखील घडल्याची चर्चा आहे.शिरूरच्या पश्चिम भागात ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रथमच दिवसा बँकेवर दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *