आम्हाला टोकाचं पाऊल उचलायला लावू नका – उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना सूचक इशारा !

244
पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  पुण्यात विधान भवन येथे करोना आढावा बैठकी घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत माहिती दिली. त्यानुसार जिल्ह्याती पहिली ते आठवीपर्यंतच्या ऑफलाईन शाळा बंद करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, निर्बंध अधिक कडक करण्यात आल्याची देखील त्यांनी माहिती दिली. याचबरोबर, “माझी समस्त पुणेकरांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आम्हाला टोकाचं कुठलं तरी पाऊल उचलायला लावू नका.” असा सूचक इशारा देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिला. या पत्रकारपरिषदेस राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची देखील उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मला सर्वांनाच आवाहन करायचे आहे की, सध्या करोना परिस्थिती ही बिकट होत चाललेली आहे. करोना संसर्ग वाढत आहे. मी आता बीएमसीचे आयुक्त चहल यांच्याशी देखील बोललो, तेव्हा त्यांनी सांगितले की मुंबईत ही रुग्ण संख्या मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईने ऑफलाईन शाळा पहिली ते आठवीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. नववीची शाळा सुरू ठेवली का तर १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे ते शाळेत आल्यानंतर त्यांना लसीकरण करणं सोपं जातं. त्यासाठी त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी देखील मी बोललो, त्यांनी सांगितलं की याबद्दलचा स्थानिकांना अधिकार दिलेला आहे की तिथली परिस्थिती काय आहे ते पाहून त्यांनी निर्णय घ्यावा. आज इथे बैठक घेत असताना, पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर ७४ टक्केच नागरिकांनी लशीचा दुसरा डोस घेतलेला आहे. माझी समस्त पुणेकरांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आम्हाला टोकाचं कुठलं तरी पाऊल उचलायला लावू नका.”



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *