कोरोना नियमांचे उल्लंघन ! पुण्यातील चार प्रसिद्ध हॉटेल्सवर मोठी कारवाई

264
पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी शहरातील चार प्रसिद्ध हॉटेलांवर मोठी कारवाई करत संबंधित व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल केला आहे.  कोरोनाचा संसर्ग (CoronaVirus) वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात खबरदारी घेतली जात असून करोना नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे. पुण्यातील चार मोठ्या हॉटेलांना याचा पहिला फटका बसला आहे.

पुण्यातील करोना रुग्णांची संख्या हजारांच्या घरात पोहोचली आहे. गर्दी टाळणे हाच करोना संसर्ग रोखण्यावरील प्रभावी उपाय असल्यामुळं याबाबत प्रशासनानं नियम व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, मास्क अनिवार्य करण्यात आले असून मॉल, हॉटेल व अन्य सार्वजनिक ठिकाणी दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी आहे. मात्र, पुण्यातील मुंढवा परिसरातील हॉटेल ड्रंक अँड पांडा, हॉटेल अजेंट जॅक, हॉटेल मेट्रो आणि हॉटेल लोकलमध्ये नियमांचं सर्रास उल्लंघन सुरू होतं. लसीचे दोन डोस पूर्ण न झालेल्या व मास्क नसलेल्या व्यक्तींनाही हॉटेलात प्रवेश दिला जात असल्याचं आढळून आलं. त्यामुळं पोलिसांनी या हॉटेलांवर कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही हॉटेलच्या मॅनेजर्सवर कलम १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी जनार्दन घोडके (वय २४, हॉटेल मॅनेजर, हॉटेल ड्रंक अँड पांडा), मारुती कोंडीबा गोरे (वय ३१, हॉटेल मॅनेजर, लोकल हॉटेल), कुणाल दशरथ मद्रे (वय २६, हॉटेल मॅनेजर,हॉटेल मेट्रो), राम जगन्नाथ गाढवे (वय ३२, हॉटेल मॅनेजर, हॉटेल अजेंटजॅक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या चारही हॉटेल्समध्ये पोलिसांना कारवाईच्या वेळी अनावश्यक गर्दी जमलेली दिसली. हॉटेल व्यवस्थापनाने गर्दी नियंत्रणात ठेवणे व लोकांना आवाहन करणे गरजेचे होते. मात्र, तसे काहीही केले गेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *