उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुरबाड रेल्वे साठी 50 टक्के खर्चाची हमी – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची फडणवीसांकडे विनंती 

596
मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड रेल्वेचा प्रश्र्न प्रलंबित असताना तत्कालीन  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी या आश्वासित व प्रस्थापित  रेल्वेचे आँनलाईन भूमिपूजन होऊन तीन वर्ष उलटले.  मात्र कुठलीही प्रक्रिया सुरू नसताना 2024 ला रेल्वे धावणार असे जाहिर भाषणात कपिल पाटीलयांनी म्हटले होते. आता राज्यात नवे सरकार स्थापन होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भेट घेतली. नियोजित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात राज्य सरकारकडून 50 टक्के खर्च उचलण्यात येणार असल्याचे पुन्हा आश्वासन देण्यात आल्याने पुन्हा मुरबाड रेल्वेचा विषय चर्चेला आला आहे. याबाबत  राज्य सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाकडे 50 टक्के खर्चाच्या हमीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश या भेटी नंतर देण्यात आले आहेत.
         केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून कल्याणहून मुरबाड पर्यंत रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यांच्या प्रयत्नानेच या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाच्या कामात राज्य सरकारने 50 टक्के वाटा उचलावा अशी मागणी 2019 मध्ये  कपिल पाटील यांनी केली होती. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता.
            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुंबईत आज भेट घेतली. तसेच नियोजित रेल्वेच्या कामासाठी राज्य सरकारकडून 50 टक्के निधी देण्याची विनंती केली. मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी रेल्वे अत्यावश्यक आहे. मुरबाडवासियांना रेल्वेसेवा देण्यास भाजपा कटीबद्ध आहे असे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात 50 टक्के वाटा उचलण्या संदर्भात हमी देण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
               या निर्णयामुळे नियोजित मुरबाड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारचा निधी मिळणार असल्यामुळे कामाला निश्चितच वेग येईल. मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल आभारी आहोत अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *