रोहिलवाडीत अंगणवाडी केंद्र मंजुरीसाठी जलद पाठपुरावा करणार – जि.प. सदस्या सुनीता गावडे यांची ग्वाही 

486
         शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाईच्या रोहिलवाडीत अंगणवाडी केंद्र लवकरात लवकर मंजूर व्हावे व तेथील बालकांना अंगणवाडीतील शिक्षण जवळच उपलब्ध व्हावे म्हणून पुणे जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाकडे जलद पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही कार्यतत्पर जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
       रोहिलवाडीत सुमारे ३० च्या वर ० ते ६ वयोगटातील बालके असून जवळपास ३ ते ४ किमी परिसरात अंगणवाडी केंद्र नाही. पर्यायाने अनेक बालके अंगणवाडी शिक्षणापासून वंचित राहात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. येथे अंगणवाडी केंद्र लवकर व्हावे म्हणून सुमारे ३५ पालक,ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन ग्रामपंचायत कवठे यांना सादर केल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनानेही तात्काळ ठराव घेत येथे हे केंद्र व्हावे म्हणून योग्य तो ठराव करीत गटविकास अधिकारी,बाल विकास प्रकल्प,शिरूर यांच्याकडे तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. येथे अंगणवाडी केंद्र व्हावे व बालकांना रोहिलवाडीतच शिक्षण,सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून रुपाली महेश रोहिले या १२ वी शिक्षित,शिक्षणप्रेमी असलेल्या महिलेने याकामी लागणारी सर्व कागदपत्रे जमा करून,पालकांच्या सह्यांचे निवेदन,वेळोवेळी पाठपुरावा करून सुमारे १५ दिवसांपूर्वीच शिरूर कार्यालयात ग्रामपंचायतीकडून प्राप्त प्रस्ताव पोहोच देण्याचे काम केले आहे.
          आता जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने रोहिलवाडी अंगणवाडी केंद्रास त्वरित मान्यता दिली तर परिसरातील रोहिले,पवार,वागदरे वस्तीतील अनेक बालकांना लवकरच जवळच अंगणवाडीची सुविधा उपलब्ध होऊ शकेल असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते विलासराव रोहिले,रामदास पवार,योगेश रोहिले व स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *