फाकटे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय व शेळी ठार – शेतकरी धास्तावले

939
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक)  – शिरूर तालुक्यातील फाकटे येथे आज शनिवार (दि. ७) ला  फाकटे- टाकळी हाजी रस्त्यावरील थोरात – हुंडारे वस्तीनजीक चंद्रकांत थोरात यांच्या शेळीवर तर संजय निचित यांच्या गायीवर दुपारी २ च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेळी व गाभण गाय जागीच ठार झाली.या घटनेने परिसरातील शेतकरी पूर्ण धास्तावले असून येथे वन विभागाने तात्काळ पिंजारा लावण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
      थोरात यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर साई  थोरात हा तरुण शेतकरी शेळ्या चारीत असताना त्याच्यापासून अवघ्या दहा फुटावरून बिबट्याने शेळीवर हल्ला करून जवळच असलेल्या उसाच्या शेतात शेळीला ओढून नेले. हे पाहिल्यानंतर साईने आरडाओरडा केला आणि घाबरून घराकडे पळाला. त्याच्या आरडाओरड्याने परिसरातील लोक तात्काळ जमा झाले. त्यावेळी त्यांनी तिथे संजय निचित यांची गाभण असलेली गाय पडलेली पाहिली. एकाच वेळी दोन ठिकाणी हल्ला झाल्यामुळे हे दोन्ही हल्ले दोन बिबट्यांनी केले असल्याची शंका स्थानिकांनी उपस्थित केली आहे.दरम्यान वन कर्मचारी विठ्ठल भुजबळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.
      भर दिवसा बिबट्याचा पशुधनावर हल्ला झाल्याने शेतक-यांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचे दिवसा दर्शन होत असल्याने मजूरीवर जाणारे मजूर ही घाबरत आहेत.
मनोहर म्हसेकर – वनपरिक्षेत्र अधिकारी,शिरूर 
        शिरूरच्या बेट भागात उसाचे क्षेत्र मुबलक असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी सहज जागा मिळत आहे. फाकटे येथील आजची घटना पहाता तेथे तात्काळ पिंजरा लावण्यात येईल. शासकीय नियमानुसार संबधीत शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येईल. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *