मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील पळू येथील रेश्मा मोरे हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

163

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) :  मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले दुर्गम भागातील पळू गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कु.रेश्मा संभाजी मोरे या तरुणीची आपल्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने तिचे मुरबाड तालुक्यातील सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेत उत्तम यश संपादन करत रेश्मा मोरे या तरुणीने आपल्या गावा सह तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 2020 च्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत पळू सारख्या दुर्गम भागातील तरुणीने उत्तम यश संपादन करून आपले नावलौकिक मिळवले आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. रेश्मा मोरे या तरुणीचे इयत्ता 1ली ते 4 थी पर्यंत शिक्षण जि. प. शाळा पळू येथे घेतले तर इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण महात्मा गांधी विद्यालय धसई येथे तर पदवी पर्यंत शिक्षण शिवळे व गोवेली कॉलेजमध्ये घेतले आहे. शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जात आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन रेश्मा मोरे या तरुणीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. त्यामुळें  मुरबाड तालुक्यात सर्वत्र तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.. मुरबाड तालुक्यातील अनेक तरुण तरुणी सध्या स्पर्धा परीक्षा, संरक्षण खात्यातील विवीध पदांची भरती तयारीला लागले असल्याने अनेक अधिकारी पुढील काळात तालुक्यातून घडतील असां विश्वास व्यक्त केला जात आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *