कथुआ जिल्ह्यातील बेकायदा अनाथाश्रमावर छापा घालून 19 मुलांची सुटका

452

जम्मू- जम्मू-काश्‍मीरमधील कथुआ जिल्ह्यातील बेकायदा अनाथाश्रमावर छापा घालून 19 मुलांची सुटका करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. ही मुले 5 ते 16 वर्षे वयोगटातील आहेत. यात आठ मुलींचा समावेश आहे.

हा अनाथाश्रमाचे संचलन केरळमधील धर्मोपदेशक करीत आहे. येथे छळवणूक होत असून, त्रास दिला जात असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केल्यानंतर स्थानिक प्रशासन व पोलिसांनी शुक्रवारी (ता. 7) छापा घातला. या प्रकरणी अँटोनी थॉमस याला अटक केली असून, “पॉस्को’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनाथाश्रमात कोणत्याही चुकीच्या गोष्टी घडत नसल्याच दावा करीत थॉमस याने त्याच्यावरीलस सर्व आरोप फेटाळले. या अनाथालयात एकूण 21 मुले राहतात. यातील दोघे लग्नकार्यासाठी त्यांच्या मूळ गावी पठाणकोट (पंजाब) येथे गेले आहेत, असे त्याने पोलिसांना सांगितले. मुलांना बाल आश्रम व नारी निकेतन या सरकारी केंद्रात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अनाथालयातील मुले पंजाब, हिमाचल प्रदेश व जम्मू येथील आहेत. मुलांच्या तक्रारीनंतर त्यांची सुटका करण्यात आली असून, अनाथाश्राची चौकशी सुरू आहे, असे कथुआचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक श्रीधर पाटील यांनी सांगितले. हा अनाथाश्रम अनेक वर्षांपासून सुरू असून, एका सामाजिक संस्थेशी तो संबंधित होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या संस्थेने त्यातून अंग काढून घेतले होते, असेही ते म्हणाले. थॉमस या आश्रमाची अधिकृत कागदपत्रे सादर करू शकला नाही. त्यामुळे आश्रम चालविण्यामागील हेतू तपासण्यात येत आहे, असे कथुआचे सहायक महसूल आयुक्त जितेंद्र मिश्रा यांनी सांगितले.

कारवाईची मागणी 
अनाथाश्रमावरील छाप्याची माहिती समजल्यावर राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जम्मूतील प्रेस क्‍लबसमोर आज निदर्शने केली. यातील आरोपीला शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *