पुणे : परवडणारी घरे देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील – दिनेश रोकडे, राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ‘एसीईडी’तर्फे ‘पंतप्रधान आवास योजने’वर कार्यक्रम

1210
         पुणे : “केंद्र सरकारने २०२२ पर्यंत सर्वांसाठी परवडणारी घरे देण्याचा संकल्प केला आहे. ‘पंतप्रधान आवास योजने’ला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून पुणे महापालिकेकडे ४० हजार पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. सध्या पालिकेकडे ६२०० घरांचे आठ प्रकल्प सुरु असून अधिकाधिक लोकांना परवडणारी घरे देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी खासगी विकासकांसोबत ‘पीपीपी’ तत्वावर प्रकल्प उभारण्यासाठी बोलणी चालू आहेत,” अशी माहिती पुणे महानगर पालिकेतील ‘पंतप्रधान आवास योजना’ विभागाचे सहसंचालक दिनेश रोकडे यांनी दिली.
       भारतरत्न एम. विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीदिनी साजरा होणार्‍या राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त असोसिएशन फॉर सिव्हिल इंजिनीअर्स डेव्हलपमेंट (एसीईडी) संस्थेच्या वतीने आयोजित ‘प्रधानमंत्री आवास योजना’ या विषयावर चर्चासत्रात दिनेश रोकडे बोलत होते. पत्रकार भवनाच्या कमिन्स सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) कार्यकारी अभियंता युवराज नाकाडे, धैर्यशील खैरे पाटील, ‘एसीईडी’चे संस्थापक सदस्य प्रकाश भट, चेअरमन अशोक रेटवडे, निखिल शहा, गोविंद देशपांडे, सतीश यंबल, विलास भोसले, प्रवीण मुंडे, रियाज पटेल आदी उपस्थित होते.
       दिनेश रोकडे म्हणाले, “सध्या शहरात हडपसर, वडगाव व अन्य भागात आठ प्रकल्प सुरु आहेत. त्यातून सव्वा सहा हजार कुटुंबाना घरे मिळतील. उर्वरित लोकांना घरे देण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यासाठी खासगी विकासकांनी पुढे येण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. ‘पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २.५० लाखाचे अनुदान सरकारकडून देण्यात येत आहे. बँकांकडूनही चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील लोकांना येत्या तीन-चार वर्षात घरे मिळतील.”
         युवराज नाकाडे म्हणाले, “शहरालगतच्या परिसरात अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधली जात आहेत. या प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा, गुणवत्ता पूर्ण काम आदी गोष्टी पीएमआरडीएकडून पाहिल्या जात आहेत. तीन ते चार लाख लोकांची मागणी असून, त्यासाठी पीएमआरडीए ऑनलाईन पद्धत राबवित आहे.”
         निखिल शहा म्हणाले, “राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ‘एसीईडी’तर्फे ‘हाऊसिंग फॉर ऑल’ आणि ‘कन्स्ट्रक्शन सेक्टर स्टार्टअप’ या विषयावर पेपर प्रेझेंटेशन आणि इनोव्हेटिव्ह आयडिया या स्पर्धा आयोजिल्या आहेत. २० सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला 50 हजार व 25 हजारांचे रोख पारितोषिक आहे. अधिक माहितीसाठी www.acedindia.com या संकेतस्थळावर अथवा ९४२३०४९९१३ वर संपर्क साधावा.” असे आवाहन केले आहे.
        धैर्यशील खैरे पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रकाश भट यांनी प्रास्ताविकात ‘एसीईडी’च्या कार्याविषयी माहिती दिली. सतीश यंबल यांनी सूत्रसंचालन केले. विलास भोसले यांनी आभार मानले.
– प्रतिनिधी,सचिन दांगडे,(सा.समाजशील,पुणे)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *