पुणे : वन्यजीव छायाचित्रांचे तीन दिवस प्रदर्शन; रिवा, कल्ला-मोहल्ला यांच्यातर्फे आयोजन; वनाधिकारी रंगनाथ नाईकडे करणार उद्घाटन

658
           पुणे : रिवा, कल्ला-मोहल्ला आणि ऍडव्हेंचर मंत्रा यांच्या संयुक्त विद्यमाने युवा छायाचित्रकारांनी काढलेल्या वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन दि. २५ ते २७ जानेवारी २०१९ या कालावधीत टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेसमोरील रिवा बिल्डिंगच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन रोज सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.
           या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. २५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. प्रतीक जोशी, विराज सिंग, ईशान बिदये, मंदार मोटे या युवा वन्यजीव छायाचित्रकारांनी ही छायाचित्रे टिपलेली आहेत. या चारही छायाचित्रकारांनी काढलेली जवळपास ३० पेक्षा अधिक छायाचित्रे येथे पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर तनय गुमास्ते या चित्रकाराने रेखाटलेली चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
  
           प्रतीक जोशी पर्यावरणशास्त्राचा विद्यार्थी असून, त्याला वन्यजीव मध्ये रस आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात असताना त्याने वन्यजीवांवर संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम केले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून प्रतीक वन्यजिवांशी संबंधित काम करत आहे. विराज सिंग यानेही पर्यावरणशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. निसर्ग, पक्षी यांच्याशी तो गेल्या चार वर्षांपासून जवळीक साधून आहे. जंगलातील आश्चर्य त्याच्या कॅमेरातून पाहायला मिळणार आहेत.
ईशान बिदये वन्यजीव आणि छायाचित्रण याचे वेड असलेला हा तरुण आहे. नॅशनल जिओग्राफिक, ऍनिमल प्लॅनेट आणि डिस्कव्हरी चॅनेलची त्याला आवड आहे. पंधरा वर्षांचा असल्यापासून तो काकांच्या मदतीने वन्यजीवांचा जवळून अभ्यास करत आहे. त्यानेही पर्यावरणशास्त्रात शिक्षण घेतले आहे. मंदार मोटे पक्षी आणि प्राण्यांची छायाचित्रे काढण्याचा छंद असलेला युवक आहे. गेल्या आठ वर्षांपासून प्राण्यांना कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न मंदार मोटे करत आहे. तनयदेखील वन्यजीव आणि पक्षीनिरीक्षण करणारा युवक आहे, अशी माहिती रिवा स्टाईलचे माधव गोडबोले, मानस गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
– प्रतिनिधी,सचिन दांगडे,(सा.समाजशील,पुणे)     



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *