उमरखेड,यवतमाळ : अवैध दारु धंद्याविरोधात यवतमाळ जिल्ह्यात पोलिसांची ‘वॉश आऊट’ मोहीम; जिल्हाभरात 37 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त तर 563 आरोपींना अटक

584
            उमरखेड,यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध दारु धंद्याविरोधात जिल्हा  पोलिस प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात ‘वॉश आऊट’ मोहीम राबविली. सदर मोहीम 19 जानेवारी ते 30 जानेवारी 2019 या कालावधीत राबविण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात 37 लक्ष 17 हजार 355 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात अवैध दारु व्यवसाय करणारे तसेच गावठी दारू निर्मिती करणा-या एकूण 563 जणांना अटक करण्यात आली आहे.
     यवतमाळ जिल्ह्यात एकूण 31 पोलिस स्टेशन आहेत. जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध दारू धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या नेतृत्वात ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात आली. यात स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथक तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमधील अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश होता. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण 550 केसेस दाखल करण्यात आल्या. यात 563 जणांवर कारवाई करून अटक करण्यात आली. तसेच 37 लक्ष 17 हजार 355 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
      अवैध दारुच्या सर्वाधिक केसेस यवतमाळ (शहर) पोलिस स्टेशन अंतर्गत करण्यात आल्या असून 40 केसेस मध्ये 42 आरोपींना अटक तर 5 लक्ष 27 हजार 571 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यानंतर यवतमाळ (ग्रामीण) पोलिस स्टेशन अंतर्गत 28 केसेसमध्ये 31 आरोपींना अटक आणि 4 लक्ष 67 हजार 803 रुपयांचा मुद्देमाल, दिग्रस पोलिस स्टेशन अंतर्गत 29 केसेसमध्ये 30 आरोपींना अटक तर 4 लक्ष 35 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल, खंडाळा पोलिस स्टेशन अंतर्गत 22 केसेसमध्ये 22 आरोपींना अटक आणि 2 लक्ष 95 हजार 516 रुपयांचा मुद्देमाल आणि कळंब पोलिस स्टेशन अंतर्गत 20 केसेसमध्ये 22 आरोपींना अटक करून 2 लक्ष 31 हजार 686 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या 36 गावांचाही समावेश आहे. या गावात अवैध दारु निर्मितीच्या एकूण 50 केसेस करण्यात आल्या असून अटक केलेल्या आरोपींची संख्या 61 आहे. या गावामधून एकूण 4 लक्ष 5 हजार 285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
            राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे सुध्दा कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे 15 ते 30 जानेवारी 2019 या कालावधीत जांब, सावरगड, मुरझडी आणि चापडोह येथे अवैध दारू धंद्याविरोधात कारवाई करण्यात आली. या गावात एकूण अवैध दारुच्या 9 प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 50 हजार 935 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात जांब येथे दोन प्रकरणात दोन आरोपींना अटक करून 13 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल, सावरगड येथे तीन प्रकरणात तीन आरोपींना अटक करून 18 हजार 316 रुपयांचा मुद्देमाल आणि मुरझडी, चापडोह व सावरगड येथे चार प्रकरणात दोन आरोपींना अटक करून 19 हजार 455 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
         पोलिस प्रशासनाने अवैध दारु धंद्याविरोधात उघडलेल्या या ‘वॉश आऊट’ मोहिमेमुळे दारु विक्रेते, गावठी दारु निर्माण करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
– विशेष प्रतिनिधी,रवी जोशी,(सा.समाजशील,उमरखेड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *