वाड्यात सर्पदंश झालेल्या रुग्णाचा रुग्णवाहिके अभावी मृत्यू

448
          वाडा,पालघर : (प्रतिनिधी,संजय लांडगे) – वाडा तालुक्यातील डाहे गावातील रमेश गवळी ( वय ४६) यांना काल रविवारी ( दि.१७) रोजी सर्पदंश झाल्याने व पुढील उपचारासाठी ठाणे येथे नेण्यासाठी वेळेवर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलबध न झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून रुग्णवाहिके अभावी एका गरीब इसमाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
           रमेश गवळी हे शेतात काम करीत असतांना सर्पदंश झाल्याने त्यांना सायंकाळी पाच वाजता तातडीने वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी गवळी यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु सर्पाच्या विषाचा प्रभाव जास्त असल्याने व उपचारास गवळी यांचे शरीर साथ देत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.  त्यासाठी व्हॅंटीलेटरची सुविधा असलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. रमेश गवळी यांचा मुलगा अनंता गवळी याने १०८ क्रमांकावर दोन ते तीन वेळा फोन केला असता जवळपास कोठेही १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रयत्न करूनही अन्य रुग्णवाहिकाही उपलब्ध न झाल्याने अखेर रात्री साडेआठ वाजता गवळी यांचा मृत्यू झाला. केवळ वेळेवर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका न मिळल्यानेच रमेश गवळी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रमेश गवळी यांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान १०८ या क्रमांकावर संपर्क साधला असता जवळपासच्या सहा ते सात रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे व त्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध न होऊ शकल्याचे बेजबाबदार उत्तर देण्यात आले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *