अलिबाग,रायगड : रायगड मधून आगामी लोकसभा निवडणूक लढाविण्यास काँग्रेसचे पंकज तांबे इच्छूक,नेहमीप्रमाणे इतर पक्षांनी यावेळी राष्ट्रीय काँग्रेसला गृहीत न धरण्याचा दिला इशारा

576
           अलिबाग,रायगड : लोकसभा, विधानसभा निवडणूका जसजश्या जवळ येत आहेत तसतशी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप आघाडीकडून सुनिल तटकरे यांची उमेदवारी निश्चितच झाली आहे. शिवसेना भाजप युतीचे भिजत घोंगडे पडले असले तरी शिवसेनेचे विद्यमान खासदार ना. अनंत गीते यांचीही उमेदवारी निश्चित आहे. तर पारंपारीक मतदारसंघ म्हणून हक्क सांगणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेसने देखील शड्डू ठोकले आहेत. लोकसभेसाठी माणगांवमधील काँग्रेसचे पंकज तांबे यांनी आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केले आहे.
          रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या रायगड जिल्ह्यातील चार व रत्नागिरी जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ठ केले गेले आहेत.रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदारसंघात कुणबी मतांचे प्राबल्य आहे. एरव्ही कोणत्याही पक्षाजवळ बांधिलकी नसणारे कुणबी मतदार लोकसभेला मात्र आपला माणुस म्हणू ना. गीते यांच्या पाठीशी उभे रहातात. ना. अनंत गीते यांच्याकडे केंद्रातील अवजड उद्योग खात्याचे मंत्रीपद आहे. मंत्री म्हणून कोकणात एकतरी उद्योग येईल अशी येथील लोकांची अपेक्षा होती मात्र ती सपशेल फोल ठरली. मंत्री म्हणून ना. गीते फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यामुळे येथील शिवसैनिकही त्यांच्यावर नाराज आहेत.
          पंकज तांबे यांनी प्रसारमाध्यमांजवळ बोलतांना सांगितले की, रायगड लोकसभा मतदारसंघ हा पारंपारीक राष्ट्रीय काँग्रेसचा मतदारसंघ आहे. 2009 च्या पुनर्रचनेआधी कुलाबा नावाने हा मतदार ओळखला जात होता. 1989 ते 1996 पर्यंत सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसचे बॅ. ए.आर. अंतुले यांनी शेकापचे दत्ता पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर दोन वेळा शेकापचे रामशेठ ठाकूर निवडून आले. 2004 च्या लोकसभा निवडणूकीत बॅ. ए. आर. अंतुले पुन्हा निवडून आले. पुढे 2009 व 2014 मध्ये अनंत गीते निवडून आले. त्यामुळे या मतदारसंघावर राष्ट्रीय काँग्रेसचाच हक्क आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले. पुढे बोलतांना पंकज तांबे यांनी सांगितले की, मुंबईचे उपनगर होवू पहाणाऱ्या रायगडला नागरी समस्यांबरोबरच इतरही समस्या भेडसावत आहेत. औद्योगिकीकणामुळं नागरीकरण वाढलंय पण त्याप्रमाणात सुविधा वाढत नाहीत. उद्योगांसोबत आलेल्या प्रदुषणाची समस्या गंभीर होत चाललीय. मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं रूंदीकरण अनेक वर्षांपासून रखडलंय. तर दुसरीकडं कोकण रेल्वेचा इथल्या प्रवाशांना काडीचाही उपयोग होत नाही. इथला तरूण नोकरीसाठी आजही मुंबईकडे धावतोय. वडिलोपार्जित जमिनी विकून तिथंच काम करण्याची वेळ इथल्या लोकांवर आली आहे.सारे राजकारणी एकाच माळेचे मणी अशीच इथल्या मतदारांची भावना झाली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे पारंपारीक मतदार मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे नेहमीप्रमाणे इतर पक्षांनी यावेळी राष्ट्रीय काँग्रेसला गृहीत धरून चालु नये असा इशारा देतांनाच पंकज तांबे यांनी आपल्या उमेदवारीसाठी आपण लवकरच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी  स्पष्ठ केले.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *