कवठे येमाई, शिरूर : ​तीव्र पाणी टंचाईचा सामना करीत असलेल्या मिडगुलवाडीला पाण्याचा टँकर देत दिला मदतीचा हात, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा उपक्रम

747
         कवठे येमाई​,शिरूरसातत्याने दुष्काळाचा व तीव्र पाणी टंचाईचा सामना करीत असलेल्या शिरूर तालुक्यातील डोंगर माथ्यावरील मिडगुलवाडी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखाण्याच्या वतीने टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मुळे येथील नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळू लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
         गेल्या अनेक वर्षांपासून मिडगुलवाडी व परिसराला पाऊस सातत्याने हुलकावणी देत असल्याने गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासूनच येथे तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली होती. मिडगुलवाडी हे उंच डोंगराच्या पायथ्याशी वसलेले छोटेशेच पण टुमदार गाव.  गावाची लोकसंख्या जेमतेम असली तरी येथे स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. शेती बरोबरच रोजंदारी हा येथील बहुसंख्य कुटुंबांचा व्यवसाय असून शेळ्या,मेंढ्या,गाया,बैल अनेक शेतकऱ्यांकडे आहेत. तर शेती बरोबरच काहींनी कर्जे काढून कुकूटपालनाचा व्यवसाय ही सुरु केला आहे. पण या वर्षी पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाल्याने शेतीसह इतर सर्वच जोडव्यवसाय धोक्यात आले नव्हे तर बंद करावे लागले आहेत. यंदाच्या कडक उन्हाळ्यात पाणी टंचाई व दुष्काळाच्या प्रचंड झळा येथील नागरिकांना बसत असून गेल्या ४-५ महिन्यापासून  येथे शासकीय पाण्याचा टँकर येथे नियमित सुरु आहे. या टँकरद्वारे  दररोज ठराविक खेपांच होत असल्याने अनेक नागरिकांना पाणी कमी उपलब्ध होत होते.
          पाण्याची ही आत्यंतिक महत्वाची गरज लक्षात घेत सरपंच गणेश मिडगुले,माजी सरपंच सुनील मिडगुले,प्रभावती मिडगुले व ग्रामपंचायत सदस्यांनी शासनाकडे टॅंकरच्या अधिकच्या खेपा मिळाव्यात म्हणून वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. याच बरोबर सरपंच आणि ग्रामस्थांनी भीमाशंकर कारखान्याकडे केलेल्या मागणीचा मनापासून विचार करुन भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनेही मिडगुलवाडी येथे पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू करण्यात आला आहे.
 कारखान्याचे अध्यक्ष,कार्यकारी संचालक,संचालक मंडळ यांनी मिडगुलवाडी येथे पिण्याच्या पाण्याचा टँकर तातडीने सुरु करीत कठीण पाणी टंचाईस तोड देत असलेल्या मिडगुलवाडी ग्रामस्थांना दिलासा दिल्याबद्दल येथील ग्रामस्थांनी कारखान्याचे आभार व्यक्त केले आहेत.
​- प्रा. ​सुभाष शेटे ,​(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)​



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *