शिक्रापूर,पुणे : तहानलेल्या वाटसरूंना पाणपोईचा दिलासा,पिंपळे धुमाळच्या शिवरुद्रा प्रतिष्ठाणचा गुढीपाडव्यास आदर्शवत उपक्रम सुरु

954
          शिक्रापूर,पुणे : सातत्याने दुष्काळाचा सामना करीत  असलेल्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपळे खालसा,पदमावती चौफुला व स्वराज कॉर्नर,हिवरे कुंभार,खैरेवाडी,खैरेनगर,कान्हूर मेसाई,मांदळवाडी या गावामध्ये रस्त्यालगत आज गुढी पाडव्यास पिंपळे धुमाळ चे माजी सरपंच राजाराम धुमाळ व ऑलिकॉन कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय तांबे यांच्या माध्यमातून विनामूल्य पाणपोईची सुरुवात करण्यात आली .गुढी पाडव्याच्या दिनी पाणपोई रुपी सामाजिक मदतीची गुढी उभारत त्यांनी एक विधायक व स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. शिवरुद्रा प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष निलेश धुमाळ व विवेक शेळके यांच्या कल्पक संकल्पनेतून जनसुविधेसाठी  विनामूल्य पाणपोईचा उपक्रम आज सूरु करण्यात आला.
        सध्याचा तीव्र उन्हाळा व कवठे येमाई ते शिक्रापूर रस्त्यावरील गावांत असणारी तीव्र पाणी टंचाई लक्षात घेत या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाटसरूंना थंड पिण्याचे पाणी मिळावे म्हणून शिवरुद्रा प्रतिष्ठाणने हा पाणपोईचा उपक्रम सुरू केला आहे.आगामी काळात पाऊस पडेपर्यंत ह्या पाणपोई सूरु ठेवणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.
        पिंपळे धुमाळांच्या पदमावती चौफुला येथे नव्यानेच आय पी एस अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या नचिकेत शेळके यांच्या हस्ते पाणपोईचा प्रारंभ करण्यात आला तर यावेळी शेळके यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.शिवरुद्रा प्रतिष्ठाणने ऐन कडक उन्हाळ्यात पाच गावात रस्त्याने जाणारे वाटसरू व परिसरातील नागरिकांना पाणपोई सुरु करून थंडगार पिण्याचे पाणी स्वखर्चाने  उपलब्ध करून दिल्याने परिसरातून त्यांच्या या उपक्रमाचे अभिनंदन होत आहे.
– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *