शिरूर,पुणे : निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच अनेकांचा मतदानापुरता “शेतकऱ्यांचे कैवारी” म्हणून आव? शेतकऱ्यांच्या अपयशाचे हेच कारण आणि शोकांतिका – संजय पाचंगे, अध्यक्ष क्रांतिवीर प्रतिष्ठाण यांचा घणाघात

1262
       शिरूर,पुणे : निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मतदानापुरता “शेतकऱ्यांचे कैवारी” म्हणून आव आणणारेच शेतकऱ्यांच्या अपयशाचे कारण आणि शोकांतिका असल्याची घणाघाती टीका क्रांतिवीर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली आहे.
शिरूर तालुक्यात घोड धरण, थिटेवाडी बंधारा, तसेच चासकमान व डिंबा धरणातून कालव्याद्वारे, घोडनदी, भिमा नदी, कुकडी नदी,  व इतर अश्या अनेक मार्गांनी पाण्याची सोय असुनही पाण्याची समस्या परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना जवळपास दहा / बारा वर्षापासून मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.
आज २०१९ मध्ये पुन्हा एकदा शिरुर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून झळा सोसतोय.अनेक ठिकाणी पाण्या सारख्या विषयावर आंदोलन सुरू झाले आणि संपलेही.शेतकऱ्यांसाठी कुणीही संघर्ष करो त्याचे स्वागतच करीत असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.
पण मुळात पाण्यासारख्या विषयावर आंदोलनाची वेळ का आली ? आणि ते आंदोलन पावसाळ्याच्याच  तोंडावर का ? कि,विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या म्हणून ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहेत. ज्या धरणाच्या पाण्यासाठी आंदोलन झाले ते घोडधरण १०,४०० फुट लांब, ९७ फुट उंच, १४०१ चौरस मैल क्षेत्रात, पाणीसाठा ७६३९ दशलक्ष घनफूट, प्रत्यक्ष वापरासाठी ६०६० घनफूट,
त्यावर दोन कालवे.उजवा कालवा ३० कि. मी. तर डावा कालवा ८० कि. मी. त्यातील पाणी एमआयडीसी साठी २० जुन १९८९ च्या पाटबंधारे विभागाच्या मान्यतेनुसार ८.५ दशलक्ष घनमीटर पाणी साठा आरक्षित करण्यात आला. एमआयडीसी चा प्रत्यक्ष वापर सरासरी ६ दशलक्ष घनमीटर असल्याची माहिती एमआयडीसी ने दिली असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.
मुळात २० जुन १९८९ ला जेव्हा एमआयडीसी साठी घोड धरणातले पाणी आरक्षित करण्यात आले तेव्हा कोणीही विरोध केला नाही. किंवा एमआयडीसी साठी चासकमान किंवा डिंबा धरणातील पाणीसाठा आरक्षित करण्याची मागणी केली नाही. चासकमान व डिंबा धरणातील पाणीसाठा एमआयडीसी साठी आरक्षित केला गेला असता तर आज घोड धरणात पाणी सोडण्यात आले असते आणि शेतकर्‍यांच्या हिस्याचे पाणी शेतकऱ्यांनाच मिळाले असते. चालु वर्षी घोडधरणातुन उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेली उपलब्ध झालेल्या आकडेवारी नुसार घोडधरण साठ्यातील पाण्यापैकी उजव्या कालव्यातून शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामासाठी ९८.७० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले (ओलिताखाली क्षेत्र ११८१हेक्टर) तर रब्बी हंगामासाठी (१), १२८.७८ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले.(ओलिताखाली ११७८ हेक्टर क्षेत्र), (२) १०२.६५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. (ओलिताखाली ९४७ हेक्टर क्षेत्र)  उन्हाळ्यात तर पाणी सोडलेच नाही.तर डाव्या कालव्यास म्हणजे श्रीगोंदे व पुढील शेतकऱ्यांसाठी खरीपासाठी ६००.४२ दशलक्ष घनफूट (ओलिताखाली क्षेत्र ६२९१ हेक्टर)
रब्बीहंगामासाठी(१) ७१६.२४दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. (ओलिताखाली क्षेत्र ६०९३ हेक्टर),
,(२) ५३८.७२ दशलक्ष घनफूट (ओलिताखाली क्षेत्र ४८३६ हेक्टर),उन्हाळ्यात पाणी सोडलेच नाही.
ही आकडेवारी पाटबंधारे विभागाने दिली असुन त्यानुसार १८५४ दशलक्ष घनफूट पाणी १७२२० हेक्टर क्षेत्रासाठी डाव्या कालव्यातून (श्रीगोंदे) सोडण्यात आले.तर ३२९ दशलक्ष घनफूट पाणी ३३०६ हेक्टर क्षेत्रासाठी उजव्या कालव्यातून (शिरुर तालुका) सोडण्यात आले.डावा कालव्यातून उजव्या कालव्याच्या ६ पट जास्त पाणी सोडण्यात आल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट दिसुन येत असल्याचे संजय पाचंगे म्हणाले. मग उरलेले पाणी कुठे मुरते ? असा आरोप ही त्यांनी केला सून या पाण्याचा हिशोबच नसल्याची बाब समोर आली आहे असे ते म्हणाले. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालीची शक्यता नाकारता येत नसुन यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे तरच शेतकर्‍यांना न्याय मिळेल असा विश्वास पाचंगे यांनी व्यक्त केला आहे.
संजय पाचंगे पुढे म्हणाले कि, शिरुर तालुक्यातील समकालीन सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शिरुर तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या खाईत सापडला आहे. सत्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना अक्षरशः वार्‍यावर सोडून दिल्याचे यातुन तरी समोर येत आहे. शिरूर तालुक्यात घोड धरणाचा अगदी ३० किमी चा कालवा पण शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचतच नाही.तसेच घोड धरणाच्या खालील तांदळी पर्यंत च्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात किती व कधी पाणी सोडावयाचे याचे सुध्दा नियोजन नाही कि राज्यकर्त्यांनी त्याबाबत कधी जागृतता दाखवली नाही.टी जर दाखवली असती तर घोड उजव्या कालव्यानजीकच्या गावांना कधीच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता. हीच अवस्था शिरुर तालुक्यातील इतर कालव्यांच्या बाबतीत ही आहे. ९५% ओलिताखाली आलेला शिरुर तालुका आज दुष्काळात होरपळून निघत आहे. इतरही सर्व सामान्य माणसांच्या प्रश्नाबाबत राजकीय उदासीनतेमुळे शिरुर तालुक्यातील शेतकरी, कामगार,तरुण हताश झालेला आहे.
आजपर्यंत ना पद, ना सत्ता ना पैसा, तरीही  सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. यापुढेही ते प्रयत्न  कायम राहतील.साधारण १ जुलै २०१९ पासून शिरुर तालुक्यातील राज्यकर्त्यांच्या आपमतलबी भुमिकेमुळे निर्माण झालेले प्रश्न जनतेसमोर मांडण्यासाठी  सुरवात करणार असल्याचा इशारा संजय पाचंगे यांनी दिला आहे.
– सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *