टाकळी हाजी,शिरूर : टाकळी हाजी येथील चारा छावणीतील व्यवस्था समाधानकारक,घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे यांचेकडून छावणीची पाहणी

609
        टाकळी हाजी,शिरूर :  शिरूर तालुक्याच्या बारमाही भागात यंदा दुष्काळाची भीषण दाहकता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सामाजिक व सहकारी संस्थांच्या माध्यमातून पश्चिम भागात जनावरांच्या चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. टाकळी हाजी येथील चारा छावणीत अनेक जनावरे दाखल झाली असून छावणीतील जनावरांची व्यवस्था समाधानकारक असल्याचे प्रतिपादन घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केले आहे. राजेंद्र गावडे यांनी आज दि. ०७ ला येथील छावणीस भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत टाकळी हाजीचे सरपंच दामू घोडे ,भीमाशंकरचे सहाय्यक ऊस विकास अधिकारी दिनकर आदक ,सुपरवायझर पोपट तरटे आदी मान्यवर होते. छावणीमध्ये जनावरांची संख्या ९००पेक्षा जास्त असून छावणीमध्ये दाखल केलेल्या जनावरांच्या मालकांची भेट घेवून विचारपूस केली तसेच छावणीतील मिळणारा ओला चारा पशुखाद्य,जनावरांना देण्यात येणारे औषोधोपचार,पाणी व्यवस्था याबद्दल आत्मीयतेने चौकशी करुन माहिती घेतली . माजी आमदार पोपटराव गावडे यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे या भागातील तीव्र दुष्काळाची पार्श्वभूमी सांगून या परिसरात छावणी चालू करण्याची मागणी केली होती.त्यानंतर भीमाशंकर कारखान्याने पुढाकार घेवून चार दिवसांत चारा छावणीची मंजुरी घेवून चारा छावणी सुरू केल्याने या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.  घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे यांनी देखिल या चारा छावणीने जनावरांसाठी केलेल्या नियोजनाचे कौतुक केले असून भविष्यात देखिल आपण सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे सा.समाजशीलशी बोलताना सांगितले .
– सतीश भाकरे,प्रतिनिधी,(सा.समाजशील,टाकळी हाजी)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *