पुणे : सीए स्थापना दिवसानिमित्त विविध उपक्रम; ५९९ जणांनी केले रक्तदान

455
पुणे (-प्रतिनिधी, सचिन दांगडे) : सनदी लेखापाल (सीए) स्थापना दिवसानिमित्त दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने सीए सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदा ७० वा सीए स्थापना दिवस साजरा झाला. २७ जून ते १ जुलै यादरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात आला. पालखी सोहळ्यात स्वच्छता अभियान, वारकऱ्यांना फराळाचे वाटप, गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शन सत्र, आर्थिक साक्षरता कार्यक्रम व करिअर काऊन्सलिंग, ९ ठिकाणी रक्तदान शिबीर, मुकुंदनगर ते बिबवेवाडी अशी ‘नाईट मॅरेथॉन’, बिबवेवाडीतील शाळेच्या परिसरात १०५ रोपांचे वृक्षारोपण, आरोग्य आणि आहार यावर कार्यशाळा, मोफत आरोग्य तपासणी, अवयवदान जनजागृती कार्यक्रम यासह बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, स्विमिंग, बुद्धिबळ अशा क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
सीए विषयाचा अभ्यास करत असणारे विद्यार्थी, संस्थेचे सभासद, कर्मचारी यांनी सगळ्याच उपक्रमांत उल्लेखनीय सहभाग घेतला. शहराच्या विविध भागात ९ ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ५९९ जणांनी रक्तदान केले. ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, ‘आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सचिव सीए समीर लड्ढा, खजिनदार सीए काशिनाथ पाठारे, सीए राजेश अगरवाल, सीए अमृता कुलकर्णी प्रत्येक उपक्रमावेळी उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे आयोजन एकूण दहा ठिकाणी करण्यात आले होते. रक्ताचे नाते चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष राम बांगड यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाट्न झाले. रक्तदान शिबिरांच्या काही ठिकाणांना भेट देत बांगड यांनी रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. यंदा एकूण ५९९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सीए सुहास बोरा यांच्या ‘एसपीसीएम’ येथे सर्वाधिक रक्तदान १८० बॉटल्स रक्तसंकलन झाले. सीए ऋता चितळे म्हणाल्या, “यंदा सीए इन्स्टिट्यूट सत्तरावा वर्धापन दिवस साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. सर्व सीए सभासद, विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सीए दिवसरात्र एकत्र करून काम करतो. त्याच्या या कार्याच्या सन्मानासाठी ही नाईट मॅरेथॉन काढण्यात आली. अशा प्रकारची नाईट मॅरेथॉन प्रथमच काढण्यात आली.”



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *