श्री शिवसाई प्रतिष्ठानतर्फे समाजभूषण, कार्यभूषण पुरस्कारांचे वितरण

427
पुणे  (-प्रतिनिधी, सचिन दांगडे) : “भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आयडा स्कडर यांनी निरपेक्ष वृत्तीने आरोग्यसेवेचे कार्य केले. मुलींसाठी वैद्यकिय महाविद्यालय सुरु केले. भौतिक जीवनाचा त्याग करून त्या समाजासाठी जागल्या. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुरुषप्रधान संस्कृतीची मुळे खोलवर रुजली असताना त्यांनी त्या काळात स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहचे कार्य उभारले. त्यांच्या योगदानामुळे आजची स्त्री शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नाव कमवत आहे. महिला मुख्याध्यापिका असलेल्या शाळांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक विकास झाल्याचे चित्र पहावयास मिळते. कारण त्यांच्या शिकवण्यात ममत्व दडलेले असते,” असे मत महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव व आंतरराष्ट्रीय वक्ते डॉ. विकास आबनावे यांनी व्यक्त केले.
श्री शिवसाई प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा ‘महर्षी धोंडो केशव कर्वे समाजभूषण पुरस्कार’ अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव व जिजामाता हायस्कुलच्या माजी मुख्याध्यापिका प्रमिला गायकवाड यांना, तर वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा ‘डॉ. आयडा स्कडर कार्यभूषण पुरस्कार’ ऍक्युपंक्चर स्पेशालिस्ट डॉ. सुमिता सातारकर यांना डॉ. आबनावें यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमावेळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शलाका पाटील, इलेक्टॉहोमिओपँथी तज्ञ प्रतिमा सिंग, संयोजिका ऍड. वैशाली भोसले, नितीन भोसले आदी उपस्थित होते. शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
प्रतिमा सिंग म्हणाल्या, ”बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. कमी वयातच मधुमेहासारखे आजार झालेले पहावयास मिळत आहे. होमिओपँथी शास्त्राच्या माध्यमातून आजार मुळापासून दूर करण्यात यश मिळते. आपल्याकडील देशी वनस्पतीत आजार बरे करण्याची ऊर्जा आहे. तसेच निरोगी आरोग्यासाठी शाकाहार हा सर्वात योग्य आणि परिपूर्ण आहार आहे. त्याचा आपण अंगीकार केला पाहिजे.”
शलाका पाटील म्हणाल्या, “समाजातील लोकांच्या समस्या, पीडा ओळखून ते दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. माणुसकीच्या नात्याने सर्वांशी जोडले जाणे गरजेचे आहे. पाळणाघर, वृद्धाश्रम संस्कृती वाढत जाणे खेदजनक आहे. सामाजिक काम कोणत्याही महाविद्यालयात जाऊन शिकता येत नाही. त्यासाठी लोकांमध्ये जाऊनच काम करणे महत्वाचे आहे.”
प्रमिला गायकवाड म्हणाल्या, ”बहुजन समाजासाठी शिक्षण देणाऱ्या संस्थेत गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. या गरीब दीनदुबळ्या मुलींची आई बनून त्यांना मी शिक्षण देण्याचे काम करत आहे.” डॉ. सुमिता सातारकर म्हणाल्या की, सरकारने २०१५ मध्ये ऍक्युपंक्चर शास्त्राला परिपूर्ण शास्त्र म्हणून मान्यता दिली. परंतु यासाठी अनेक वर्ष लढा द्यावा लागला. या शास्त्राला आपल्या देशात शैक्षणिक आणि वैद्यकीय वारसा आहे. विभा आबनावे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ऍड. वैशाली भोसले, नितीन भोसले यांनी आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *