कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातूनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार प्रकाश दादा डहाके यांचा उमेदवारी अर्ज दाखल,  समर्थकांसह शहरातून रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन

1684

       कारंजा,वाशीम : (ब्युरो रिपोर्ट) वाशीम जिल्ह्यातील कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी माजी आमदार प्रकाश दादा डहाके यांना मिळाल्याने मतदार संघात एकच जल्लोष पाहावयास मिळाला. डहाके यांनी आज शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शना सह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  यावेळी कारंजा शहरासह तालुक्यातील प्रकाश दादा डहाके समर्थकांची मोठी गर्दी दिसत होती.
माजी आमदार प्रकाश डहाके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्वप्रथम यांनी कारंजा शहराचे आराध्य दैवत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तसेच कामाक्षा मातेचे दर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आशीर्वाद घेतले.  त्यानंतर जेसीज गार्डन समोर चांडक ट्रेडर्स येथे आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.  नंतर ही रॅली जयस्तंभ चौक, शिवाजी महाराज पुतळा, टिळक चौक, सुभाष चंद्र चौक, शिवाजीनगर येथून तहसील कार्यालयाजवळ आली.  या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  माजी आमदार प्रकाश दादा डहाके यांना ऐन वेळेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली.  दादांनी शिवसेनेचे शिवबंधन सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ पुन्हा आपल्या हातात बांधले.  त्यांची उमेदवारी नक्की होताच कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला व डहाके यांच्या उमेदवारीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रकाश दादांसमवेत  कारंजा शहरातील तसेच तालुक्यातील कार्यकर्त्यांची हजारोच्या संख्येनेउपस्थिती होती.  प्रकाश डहाके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यामुळे विधानसभेची या मतदार संघातील निवडणूक चुरशीची होणार आहे यात शंका नाही.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *