वादळी पावसाने नुकसान झालेल्या शेती,पिकांचे पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्यांना त्वरित नुकसाभरपाई मिळावी – आ. दिलीप वळसे पाटील

695
           कवठे येमाई,शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – आंबेगाव-शिरूर तालुकयातील अनेक गावात ६ दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या जोरदार वादळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने कांदा,भुईमूग,भात,सोयाबीन,बाजरी,मका,तरकारी पिके,जनावरांचे खाद्य,आंबा,डाळिंब,शेवग्याच्या बागांना याचा मोठाच फटका बसला आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकरी हा पूर्णतः शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून असून हातातोंडाशी आलेली अनेक पिके या वादळात सापडून नष्ट झाल्याने शेतकरी मोठ्याच आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने याभागातील शेती व शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्यांना तातडीने नुकसान भरापाई  देण्याची मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा शिरूर आंबेगावचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी केली आहे . या मागणी बाबतचे निवेदन  वळसे पाटील यांनी पुणे जिल्हाधिकाऱयांना दिले असून याबाबत त्वरित योग्य व उचित कारवाई करण्याची विनंती देखील वळसे पाटील यांनी केली आहे.
             तर आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या निवेदनाची शासनाकडून तात्काळ दखल घेण्यात आली असून उपविभागीय अधिकारी जुन्नर,आंबेगाव यांनी आंबेगाव तहसीलदारांना आदेश देत परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती व पिकांचे तलाठी,कर्मचारी व गावपातळी वरील कर्मचाऱयांची नेमणूक करून त्वरित पंचनामे करून शासनाच्या निदेशाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
     याच परतीच्या वादळी पावसाने शिरूर तालुक्यातील बेट भागातील माळवाडी,फाकटे,चांडोह परिसरात शेती व पिकांचे मोठेच नुकसान झाले असून या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात येऊन शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *