शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी मुरबाडमध्ये शिवसेनेचा पुढाकार,प्रत्येक शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून देण्याचा सेनेचा निर्धार  

413
          मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शेतकऱ्यांना फॉर्म वाटप सुरू केले आहे. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळवून देण्याचा निर्धार शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
         मुरबाड तालुक्याची बहुतांशी अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलैमध्ये आलेला पूर आणि दिवाळीच्या काळात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठाच फटका बसला आहे. या पावसाने नाचणी, वरई आणि भाजीपाला उत्पादकांचेही खूपच नुकसान झाले. या शेतकऱ्यांना दिलासा देण्याबरोबरच शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शिवसेनेने मुरबाडमध्ये बैठक झाली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीला हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील उपस्थित होते.
        अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर संकट आणले.या संकटात शेतकऱ्यांच्या पाठिशी शिवसेना आहे अशी ग्वाही प्रकाश पाटील यांनी शेतकऱ्यांना दिली. तर मुरबाड तालुक्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना बांधील आहे असे आश्वासन सुभाष पवार यांनी दिले. या बैठकीत शेतकऱ्यांना पंचनामे करण्याबाबतच्या फॉर्मची माहिती देण्यात आली. तसेच सरकारी अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून नुकसानीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती श्रीमती चंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, समन्वयक रामभाऊ दळवी, संघटक आप्पा घुडे, जिल्हा परिषदेचे सदस्य किसन गिरा, रेखाताई कंटे, पंचायत समितीतील गटनेते अनिल देसले, राम दुधाळे, प्रकाश सुरोसे, प्रगती गायकर, योगिता विशे, पद्मा पवार, पांडुरंग कोर, मधुकर मोहपे, प्रकाश पवार  ,संजय पवार,मोहन भावार्थे, जगन घुडे यांच्यासह बाजार समिती व खरेदी-विक्री संघाचे संचालक, सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी आदींसह शेतकरी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *