महाराष्ट्राला ‘नॅशनल स्पोर्ट चॅम्पियनशिप’चे विजेतेपद इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्पर्धेचे आयोजन

405
           पुणे : (प्रतिनिधी,सचिन दांगडे) – भारत सरकारद्वारा नोंदणीकृत इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनच्या (आयएसए) वतीने आयोजिलेल्या ‘ओपन नॅशनल स्पोर्ट चॅम्पियनशिप’चे विजेतेपद महाराष्ट्राने मिळवले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ५९ सुवर्ण, ६३ रौप्य आणि १४ कांस्य अशा एकूण १३६ पदकांची कमाई केली. तामिळनाडूच्या खेळाडूंनी ११९ पदके जिंकत दुसरे स्थान पटकावले. त्यामध्ये ५६ सुवर्ण, ५३ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे. १४, १७, १९, २२, २५ वर्षाखालील अशा विविध वयोगटात बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात नुकतीच ही स्पर्धा पार पडली.
          या चॅम्पियनशिपमध्ये अ‍ॅथलेटिक्स, कबड्डी, रोलर, स्केटिंग, कुस्ती, तायक्वांदो, कराटे, खो-खो, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बेसबॉल, बॅडमिंटन, वूशु आदी १२ क्रीडा प्रकारात देशभरातून सुमारे २५० खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्रासह कर्नाटक, हरियाणा, बिहार, दिल्ली, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगाल, आसाम आदी राज्यांतील खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्यमंत्री डॉ. गुरुमुख जगवाणी यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘आयएसए’चे उपाध्यक्ष कमल मलकानी, खजिनदार व मुख्य संयोजक सुरेश हेमनानी, जनसंपर्क अधिकारी जयदेव डेम्बरा, विनोद मेघांनी, राजीव धलवानी, जयहिंद हायस्कुलच्या प्राचार्या ज्योती मलकानी आदी उपस्थित होत्या.
           डॉ. गुरुमुख जगवाणी म्हणाले, “देशभरातील खेळाडूंना आपल्यातील क्षमता सिद्ध करण्यासाठी हे एक योग्य व्यासपीठ आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमधून चांगले खेळाडू शोधून त्यांना प्रशिक्षण, साहाय्य आणि योग्य मार्गदर्शन देण्यासाठी इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनने प्रयत्न करावेत. जिल्हास्तरापासून राष्ट्रीय स्तरावर स्पर्धाचे आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत खेळाडूंना आम्हा सर्वांचे सहकार्य राहील.”
            सर्व स्तरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही नॅशनल ओपन चॅम्पियनशिप आयोजिली होती.  असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण व निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे संयोजक सुरेश हेमनानी यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *