गौ-अन्नकोट महोत्सवात ४५ गोशाळांना प्रत्येकी ५५० किलो पशुखाद्याचे वाटप, श्री सालासर हनुमान चालीसा मंडळाचा उपक्रम  

337
          पुणे : (प्रतिनिधी,सचिन दांगडे) – प्रभु श्रीराम तसेच रामभक्त हनुमान यांच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या श्री सालासर हनुमान चालीसा मंडळ, पुणे यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही अनोख्या गौ-अन्नकोट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गोमातेचे, पशुखाद्याचे पूजन करून पुणे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सुमारे ४५ गोशाळांना प्रत्येकी ५५० किलो पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. सरकी पेंड, एच. पी. गोळी, भुस्सा, तूर चुनी, मका चुनी, चना कोळ, हिरवा चारा, गुळ, मीठ, हिरवा चारा आदी खाद्याचा यात समावेश आहे. माहेशवरी समाजातील बांधवांच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात येतो.
        गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्यावरील गोयल गार्डन येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे, उद्योजक शेखर मुंदडा व जळगावचे सामाजिक कार्यकर्ते सुनील झंवर आदी पाहुण्यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. त्यानंतर पशुखाद्य मांडलेल्या अन्नकोटचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केल्यानंतर गोशाळांच्या प्रतिनिधींना बोलावून प्रातिनिधिक स्वरूपात पशुखाद्य वितरित करण्यात आले. यावेळी रजत राठी व पुष्करणी भट्टड यांना युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसंगी शामसुंदरजी कलंत्री, बंकटलालजी मुंदडा, पुष्पाजी विजयकुमार कासट, विष्णु चमाडिया, नरेश जालन, प्रकाश फोफळीया, महेश सहकारी बँक, शामसुंदर राठी, गणेश भुतडा, रत्नेश राठी, संगीता बिहानी, रविंद्र जाखोटिया, कन्हैयालाल श्रॉफ, गौरव मणियार या मान्यवरांनी या गो-अन्नकोटचे यजमानपद भुषविले.इंदौर येथील सुप्रसिध्द भजनगायक द्वारका मंत्री यांच्या भजनसंध्येने वातावरण भक्तिमय झाले होते. आपल्या सुरेल आवाजाने त्यांनी उपस्थित गो- भक्तांना मंत्रमुग्ध केले. हनुमानाच्या वेशात आलेल्या भक्तामुळे वातावरणात साक्षात भगवान हनुमान आल्याचे जाणवत होते. कार्यक्रमात माहेशवरी तसेच अन्य विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाचे वितरण करून झाली.
         सामाजिक काम करण्याची इच्छा मनात असल्यास आपण कोणत्याही माध्यमातून करू शकतो, याचा आदर्श श्री सालासर हनुमान चालीसा मंडळाने समाजापुढे घालून दिला आहे, अशा शब्दात शेखर मुंदडा यांनी उपक्रमाचे कौतुक केले. सुनील झंवर यांनीही हा अतिशय अनोखा उपक्रम असल्याचे सांगून असे उपक्रम राबवायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *