बदलता काळ, हवामान लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त प्रशिक्षण घ्यावे – सुभाष पवार 

530
           मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – बदलता काळ व सातत्याने बदलणारे हवामान लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने शेतीचे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आज येथे केले. पारंपरिक पद्धतीच्या शेतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबी स्वीकारून आता त्याला विज्ञानाची जोड द्यावी असे मत पवार यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारचा कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि मुरबाड पंचायत समितीच्या वतीने माळ येथे शेतकरी प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती किशोर जाधव, पंचायत समितीचे सभापती दत्तू वाघ, जिल्हा परिषदेचे सदस्य उल्हास बांगर, किसन गिरा, अनिल देसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात वाढते शहरीकरण होत आहे. शहरी भागाला दर्जेदार धान्य, भाजीपाल्यासह कृषीपूरक वस्तूंची आवश्यकता आहे. मात्र, तेथे नाशिक व पुणे जिल्ह्यातून भाजीपाला येत आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांना सहजपणे ही बाजारपेठ उपलब्ध आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सुभाष पवार यांनी करुन शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने शेती करण्याचे आवाहन केले. गेल्या काही वर्षांत हवामानामध्ये बदल होत आहे. त्याचबरोबर शेतीच्या पद्धतीतही बदल करण्याची नितांत गरज आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या सहकार्याने जिल्हा परिषदेने अनेक बाबींचा अभ्यास केला. त्यानंतर जिल्ह्यात शेतकरी प्रशिक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गात शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल असे पवार यांनी सांगितले.
   एकेकाळी ठाणे हा कृषीप्रधान जिल्हा होता. मात्र दिवसेंदिवस कृषी उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी शेतीव्यवसाय सोडला. या शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीकडे वळावे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतल्यास उत्पन्नात निश्चितच वाढ होईल असा विश्वास सभापती किशोर जाधव यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला माळ परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *