‘संगीतभारती-नृत्यभारती’ आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय व उपशास्त्रीय स्पर्धा

912
विद्यार्थ्यांतील कलाकार बहरण्यासाठी
पालक-शिक्षकांचे प्रोत्साहन गरजेचे
नुपूर दैठणकर; ‘संगीतभारती’त सुधांशु मणेरीकर, तर ‘नृत्यभारती’त सुकन्या गुरव प्रथम
पुणे (-प्रतिनिधी, सचिन दांगडे): “अभिनेत्री किंवा नृत्यांगना यापेक्षा नृत्यसाधक ही ओळख अधिक जवळची वाटते. कलेचे बाळकडू घरातूनच मिळाले. प्रत्येकाच्या घरात असे वातावरण असतेच असे नाही. शालेय-महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धांमधून विद्यार्थ्यांतील कलाकाराला व्यासपीठ मिळत असते. त्यामुळे विद्यार्थीदशेत कलेची आवड जोपासायला हवी. तसेच पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांतील कलाकार घडविण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे,” असे मत अभिनेत्री-नृत्यांगना नुपूर दैठणकर यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कुल ऑफ मॅनेजमेंटच्या (अंडरग्रॅज्युएट) वतीने आयोजित संगीतभारती व नृत्यभारती या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन व नृत्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी नुपूर दैठणकर बोलत होत्या. एमआयटी कोथरूडच्या विवेकानंद सभागृहात झालेल्या समारंभावेळी जेष्ठ गायिका कस्तुरी दातार अत्रावळकर, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. राजीव ठाकूर, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट अँड लॉ चे प्र-कुलगुरू डॉ. राजीव ठाकूर, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अंजली साने, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सुनील देव, बाफना मोटरचे राहुल काळे, स्पर्धेच्या परीक्षक गायिका संपदा वाळवेकर, नृत्य परीक्षक नृत्यांगना पल्लवी देशमुख, स्पर्धेच्या संयोजिका कल्याणी बेलसरे आदी उपस्थित होते.
राज्यभरातुन संगीतभारती आणि नृत्यभारती या स्पर्धेत ५० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. शास्त्रीय गटात सुधांशु मणेरीकर याने प्रथम, शीतल गद्रे हिने द्वितीय, तर मीता दांडेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. उपशास्त्रीय गटात सुधांशु मणेरीकर याने प्रथम, शीतल गद्रे हिने द्वितीय तर रोहित गुळवणी याने तृतीय क्रमांक पटकाविला. इंस्ट्रुमेंटल प्रकारात शंतनू कानडे (हार्मोनियम) याने प्रथम तर सिद्धार्थ गरुड (सतार) याने द्वितीय क्रमांक पटकावला. नृत्यभारती एकल प्रकारात सुकन्या गुरव, रमा जोशी, गौरी चिटणीस यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. तर सामूहिक नृत्य प्रकारात हिमानी-आकांक्षा, मनीषा नृत्यालय आणि राजलक्ष्मी-मयुरी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दीड हजार रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते.
नुपूर दैठणकर म्हणाल्या, “महाविद्यालयातील विविध उपक्रम, तसेच स्पर्धांमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे. यश-अपयश आले, तरी इतरांच्या सादरीकरणातून आपणही शिकत राहिले पाहिजे. उत्तम सादरीकरणासाठी आत्मपरीक्षण आणि सततचा सर्व उपयुक्त ठरतो.” कस्तुरी दातार अत्रावळकर म्हणाल्या, ”स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह बघून आनंद वाटतो. महाविद्यालयातील दिवस पुन्हा येत नाहीत; त्यामुळे हे क्षण भरभरुन जगा. नृत्य-संगीत या कलांसाठी वेळ देणे गरजेचे आहे. या कला आवड, करिअर, छंद म्हणून जोपासा. त्यातून आनंद आणि समाधान मिळते.” शुभम बावळेकर, देवांश तिवारी या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कल्याणी बेलसरे यांनी आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *