आनंदनगर बंधाऱ्याची गळती तातडीने थांबवणार ; शेतकऱ्यांचे उपोषण मागे

406

इंदापूर : इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या आनंदनगर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे निकृष्ट काम करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करू तसेच बंधाऱ्याचे तातडीने गळती थांबविण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिल्यानंतर धैर्यशील मोहीते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज सकाळी सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेतले. आनंदनगर येथील बंधाऱ्याच्या दरवाजांचे काम निकृष्ट झाल्यामुळे नदीतले पाणी वाहुन गेले. पाऊसकाळ चांगला होऊनही शेतकऱ्यांवर पाणी टंचाईची वेळ आली. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या कारभारा विरोधात इंदापूर व माळशिरस तालुक्यातील सहा गावच्या शेतकऱ्यांनी धैर्यशील मोहीते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंधाऱ्यावरती बेमुदत उपोषण सुरु केले होते. आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडके, उपअभियंता अमोल मस्कर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुर्वी ज्या ठेकेदाराने निकृष्ट पध्दतीचे काम केले होते, त्याचे कामाचे बिल अडवून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच तातडीने आतील बाजूस असणाऱ्या अतिरीक्त राखीव जागेत नविन दरवाजे बसवून पाण्याची गळती रोखण्यात येईल. त्याचप्रमाणे  भविष्यकाळात नवीन दरवाजे बसवण्यात येतील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणस्थळी जेष्ठ नेते विजयसिंह मोहीते पाटील, शिवतेजसिंह मोहीते-पाटील, राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी भेट दिली. उपोषणस्थळी आनंदीगणेश पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष दत्ता घोगरे, वसंत जाधव, वसंत गायकवाङ, रामचंद्र गायकवाङ, राजेंद्र काटकर व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *