मुरबाड मध्ये मनमानी पध्दतीने स्वयं घोषित लॉकडाऊन करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याची श्रमिक मुक्ती संघटनेची मागणी

783
              मुरबाड,ठाणे : (जयदीप अढाईगे,सा.समाजशील वृत्तसेवा – मुरबाड तालुक्यात स्वयंघोषित कडकडीत लॉकडाऊन  करणाऱ्या ग्रामपंचायतींनी मनमानी कारभार करू नये यासाठी कठोर सूचना द्याव्या अशी मागणी  श्रमिक मुक्ती संघटने तर्फे जिल्हाधिकारी ठाणे यांचे कडे केली आहे.
              मुरबाड तालुक्यात  कोरोना साथ आटोक्यात ठेवण्याच्या नावाखाली मुरबाड तालुक्यातील ग्रामीण व शहरी जनतेसाठी प्रमुख बाजार, दवाखाने आणि बॅंका असलेल्या टोकावडे, धसई या सारख्या काही ग्रामपंचायती स्वयंघोषित पणे कडकडीत लॉकडाऊन वारंवार करीत आहेत.संबंधितांनी मनमानी कारभार करू नये या साठी  कठोर सूचना दयव्यात अशी मागणी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेत्या इंदवी तुळपुळे यांनी जिल्हाधिकारी  ठाणे यांचे कडे केली आहे
              बंद दरम्यान दवाखाने, मेडिकल दुकाने, किराणा दुकाने व दुध विक्री ही बंद केली जात आहे. एवढेच नव्हे तर परिसरातील खेड्यापाड्यातुन आदिवासी बांधवाना अत्यावश्यक गरजांसाठीही प्रवेश दिला जात नाही. स्थानिक पोलिसही यात पाठिंबा देत आहेत.आता भात लावणीच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी शेतकरी 15-20 दिवसांचे सामान भरू पहाताना त्यांना बाजारपेठेत अडवणे म्हणजे  मोठाच अन्याय आहे. तसेच आधी केलेल्या कामांची बँकेतील मजुरीची रक्कम काढणे, खते खरेदी अशी अनेक कामे शेतकऱ्यांना करायची आहेत.
               पावसाळ्यात होणारे साथीचे आजार, सर्पदंश, विंचू दंश यासारख्या आणीबाणीच्या वेळी स्थानिक सरकारी व खासगी दवाखाने, मेडिकल दुकाने सुरू राहणे अत्यंत आवश्यक आहे.त्यासाठी संबंधितांनी मनमानी कारभार करू नये या साठी प्रशासनाने काही ठळक मार्गदर्शक तत्व जाहीर करावीत तसेच एस टी वाहतूक बंद करण्यात आल्याने आदिवासी भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात येणे अडचणीचे झाले आहे. त्या भागासाठी जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारे वाहन गावागावात पाठवावे बंदच्या काळात शहरी भागातील प्रत्येक प्रभागा मध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्याची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *