इंदापूरच्या सुरवड येथे  कलाकारांना पत्रकार संघाकडून जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती 

407
           इंदापूर,पुणे : (प्रतिनिधी, मल्हारी लोखंडे) – इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेला तर पत्रकार संघाने लॉक डाउन काळात मदत केलीच,परंतु ग्रामीण भागातील कलाकार टिकला पाहिजे,जगला पाहिजे,या उद्देशाने कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचे किट मोफत देऊन,समाज उपयोगी काम केले आहे.त्यामुळे इंदापूर तालुक्यातील गरीब जनता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला कधीही विसरणार नाही असे गौरवोद्गार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.
          महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर, ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने कलाकारांना मोफत अन्नधान्याचे व वस्तूंचे किटचे वाटप इंदापूर तालुक्यातील सुरवड येथील श्री कृष्ण पॅलेस मंगल कार्यालय प्रांगणात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले,राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील,महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर, पत्रकार संघाचे मार्गदर्शक मधुकर गलांडे,मुख्य सचिव सागर शिंदे,इंदापूर तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार,पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी,प्रसिद्धीप्रमुख सोमनाथ ढोले,जिल्हा कार्यकारणी सदस्य भीमराव आरडे, सुरेश मिसाळ,निखिल कनसे,विजय शिंदे,दत्तात्रय गवळी,सचिन खुरंगे,उदयसिंह जाधव देशमुख,इम्तियाज मुलाणी,रामदास पवार,शिवाजी पवार,शिवकुमार गुणवरे तसेच शिक्षक नेते दत्तात्रय तोरसकर, ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे,बाळासाहेब करगळ,नवनाथरुपनवर,ह.भ.प.शेरकर महाराज,प्रेस फोटोग्राफर स्वप्नील चव्हाण,शंकर मासाळ यांच्यासह भजणी,विणेकरी,किर्तनकार,प्रवचणकार,भारुडकार,गोंधळी,व इतर कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,टाटा बिर्ला च्या आशीर्वादाची गरज नसून, गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाची गरज आहे.ज्याला गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे त्याला कधीही काही कमी पडत नाही.हेच सूत्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने ओळखून गोरगरीब सामान्य जनतेला मदत करण्याची भूमिका गेल्या सहा महिन्यापासून ठेवले आहे.त्यामुळे पत्रकार संघाला मोठे आशीर्वाद मिळाले आहेत. ग्रामीण भागातला कलाकार लॉकडाऊन  कालावधीत घरी बसून आहे.त्याला इतरत्र फिरता येत नाही.ही अडचण पत्रकार संघाने जाणून कलाकारांना मदतीचा हात दिला आहे.त्यामुळे पत्रकार संघाची सर्व घटकापर्यंत जीवनावश्यक वस्तू मोफत वाटण्याची मदत पोहच झाली आहे.खरे तर वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद माझ्यासारख्या,सामान्य माणसाच्या पाठीशी असल्यामुळे व तालुक्यातील जनतेने मला इतक्या मोठ्या पदावर पोहोचल्यामुळे,पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन देश लॉक डाऊन असताना घेता आले हे भाग्य इंदापूर तालुक्याचे आहे अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
               यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते म्हणाले की, कलाकार हा गावाकडचा असतो.आणि कलाकारांची संख्या पुणे जिल्ह्यात अधिकची इंदापूर तालुक्यात आहे. या कलाकार मंडळींना अडचणीच्या काळात मदत करणे हे आपले कर्तव्य आहे त्यामुळेच पत्रकार संघाच्या माध्यमातून अशा कलाकारांना मदत करण्याची भूमिका पत्रकार संघाने घेतलेली आहे.तालुक्यातील सर्व कलाकारांपर्यंत पत्रकार संघाची मदत पोहोच करण्याची ची ग्वाही तालुका अध्यक्ष मोहिते यांनी दिली.
            राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आरोग्य विभागात  उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य सेविका यांचा सन्मान करण्यात आला.उपस्थितांचे स्वागत राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते तसेच मुख्य सचिव सागर शिंदे मुख्य मार्गदर्शक मधुकर गलांडे यांनी केले तर आभार तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार यांनी मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *