जिल्हयाच्या ग्रामीण भागामध्ये ‘आशा सर्वेक्षण’ कोरोना रूग्ण शोधण्यासाठी ठरले सर्वोत्तम    

333

घोडेगाव,ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सिताराम काळे) : पुणे जिल्हयामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर जिल्हयाच्या ग्रामीण भागामध्ये करण्यात येत असलेले ‘आशा’ सर्वेक्षण कोरोना रूग्ण शोधण्यासाठी सर्वोत्तम ठरले आहे. आंबेगाव तालुक्यातील ४९ हजार ४०५ कुटुंबांचे नियमितपणे आशा सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये मुंबई, पुणे व इतर ठिकाणांहून आलेल्या नागरिकांच्याही नोंदी घेण्यात आल्या. या सर्वेक्षणावरून संदर्भित केलेल्या व्यक्तिंमधून ९६ कोरोना रूग्ण आढळून आल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले. जिल्हा परीषदेकडून आशा सेवकांमार्फत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली. या तपासणीचा अहवाल नियमितपणे प्रशासनाकडे येत असून, त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील २२९ आशांची सर्वेक्षणाची कामगिरी समोर आली आहे. तालुक्यातील २ लाख १४ हजार ९७६ लोकसंख्या असलेल्या ४९ हजार ४०५ कुटुंबांचे सर्वेक्षण आशा वर्कर यांच्या मार्फत झाले व आजही ते सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये किमान तीन ते चार वेळा गृहभेटी देण्यात आल्या. दररोज किमान ५० ते १०० घरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी प्रत्येक पथकावर देण्यात आली आहे. पथकामध्ये वैदयकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी सहभागी आहे. या सर्वेक्षणामधूनच बाहेरील गावावरून आलेल्या व्यक्ति तसेच कुटुंबांमध्ये आलेले नातेवाईक यांची अचूक माहिती मिळाली. यामध्ये ६० वर्षावरील व्यक्ति, मधुमेह, रक्तदाब व इतर आजारांवरील व्यक्तिंची नोंद घेण्यात येऊन तपासणी केली जात आहे. तालुक्यात रूग्णांची संख्या वाढत आहे. या रूग्णांवर उपचारासाठी व्यवस्था तसेच सुविधा निर्माण केल्या जात असून, कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. त्यांच्या नियोजनासाठी देखील हे सर्वेक्षण उपयोगी ठरले असल्याचे डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले. दि. १८ मे रोजी साकोरे येथे पहिला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळला आणि तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व प्रांत जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्षनाखाली तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी ग्रामस्थ व तालुक्यातील नागरिकांना भिती न बाळगण्याचे आवाहन केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *