कोरोना बाधीत रुग्णांना उपचाराठी मिळणार १ लाख रुपये ; अटी लागू 

515

घोडेगाव,ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सिताराम काळे) : पुणे जिल्हयातील ग्रामीण भागातील कोरोना बाधीत व संशयीत रूग्णांनी नोंदणीकृत खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यास डॉ. रखमाबाई राऊत योजने अंतर्गत रूग्णांचा एक लाखापर्यंतचा वैदयकीय खर्च जिल्हा परीषद करणार असल्याची माहिती आंबेगाव पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी दिली. पुणे जिल्हापरीषदेच्या स्व:निधीतून ही अर्थसहाय योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्हयातील सर्व पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी यांना आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या कोरोनाचा संसर्ग झालेले किंवा संशयीत रूग्णांवर नोंदणीकृत खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले असतील अशा रूग्णांचे प्रस्ताव सदरच्या योजनेच्या लाभासाठी विहित नमुन्यात या कार्यालयास सादर करावेत, असे आदेश पत्राव्दारे देण्यात आले आहेत. या योजने अंतर्गत कोरोना संशयीत रूग्ण म्हणून उपचार घेतल्यास ५ हजार रूपये, विलगीकरणातील संशयीत रूग्णांसाठी ५० हजार रूपये, अतिदक्षता विभागात उपचार घेतलेल्या रूग्णांकरीता ७५ हजार रूपये तर व्हेंटीलेटरवर उपचार घेतलेल्या रूग्णांकरीता १ लाख रूपये प्रती रूग्णास मिळणार आहेत.   लाभार्थी रूग्ण पुणे जिल्हयातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा. त्याने ज्या खासगी रूग्णालयात उपचार घेतले असतील ते रूग्णालय बॉंम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्टअंतर्गत नोंदणीकृत असावे. हा लाभ फक्त  कोरोना रूग्णावरील उपचारासाठी आहे. सदरचा लाभार्थी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, धर्मदाय आयुक्तांकडील मदत योजना किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेचा (वैयक्तिक आरोग्य विमा योजना इ.) लाभधारक नसावा. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या योजनेचा लाभ सर्व सामान्य नागरिकांना होणार असल्याचे सभापती संजय गवारी यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *