भाताचे पिक वाया जाण्याच्या भितीने आदिवासी चिंतेत

551

घोडेगाव,ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचे प्रमाण सर्वाधिक जास्त असल्याने सुरूवातीला चांगला पाऊस झाला आणि भात लागवडीला सुरूवात झाली. परंतु नंतर पावसाने दडी मारल्याने भात लागवड झालेल्या खाचरांत पाणी आटल्याने या खाचरांत भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. तर काही खाचरात पाणी नसल्याने भात लावणी करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे आदिवासी बांधव भाताचे पिक वाया जाण्याच्या भितीने चिंतेत पडले आहे. तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या तीन खो-यातील परीसर भात शेतीचे आगार समजली जाते. पुणे जिल्हयातील एकूण भातक्षेत्र ६३, ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५,१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भात लागवड केली जाते. येथील आदिवासी शेतकरी हा बारा महिन्यातून भात एकमेव पिक काढतो. भातशेती हेच या भागातील आदिवासी शेतक-यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्यामुळे त्यांच्या जीवनाचा तो मुख्य आधार समजला जातो. तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी आकाश ढगांनी भरून राहते मात्र दमदार पावसाची हजेरी लागली नाही. जुलै महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर जून महिन्यात चक्री वादळाबरोबर पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु त्यानंतर मोठा पाऊस झाला नसल्याने या भागातील काही शेतकरी मोटारीच्या सहायाने पाणी खाचरांमध्ये तुंबवून भात लावणी करत आहे. ज्यांची भाताची पिके लवकर लावणीला आली होती त्यांनी सुरूवातीच्या पावसात थोडीफार लावणी करून घेतली होती. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने तसेच लावणीसाठी खाचरांमध्ये पाणी नसल्याने चिखल करता येत नसल्याने लावण्या अर्धवट राहिल्या. पाऊसमान जर असेच राहिले तर भात पिकांवर परिणाम होऊन भाताचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *