बिबट्याचा दिवसाच मेंढ्यांच्या कळपावर हल्ला – कवठे येमाईच्या ढगेमाथा येथील घटना – घटनेत मेंढी ठार 

1010
           शिरूर,पुणे  : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या ढगे माथ्यानजिक आज दि.२६ ला दिवसाच दुपारी एक च्या दरम्यान मेंढयांच्या काळपावर चाल करून गेलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार झाल्याची घटना घडली आहे. आधीच कोरोनाचे संकट व त्यातच बिबट्याची दहशत सुरूच असल्याने शेतवस्तीवर राहणारे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.घटनेबाबत पत्रकार शेटे यांनी शिरूर वनविभागास माहिती देताच वनकर्मचारी हनुमंत कारकूड यांनी लगेचच घटनास्थळी येत घटनेची माहिती घेऊन तात्काळ पंचनामा केला आहे.
            याबाबत शेतकरी बारकू रोहिले वय ७० या मेंढपाळ शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आज रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ते आपल्या ढगेमाथ्या जवळील शेतानजीकच्या बांधाजवळ बकरे चारीत असताना बाजूकडील उसाच्या शेतातून आलेल्या भल्यामोठ्या बिबट्याने थेट मेंढ्यांच्या काळपावर हल्ला करीत एका मेंढी ठार करीत तिला उसाच्या शेतात बिबट्या घेऊन गेला. पण बारकू रोहिले या मेंढपाळ शेतकऱ्याने हातातील काठीसह बिबट्याच्या मागे धाव घेत मेंढी बिबट्याच्या तावडीतून सोडविली पण बिबट्याने मेंढीच्या गळ्यावरच चावा घेतल्याने या घटनेत मेंढी जागेवरच ठार झाली. पत्रकार सुभाष शेटे यांच्या शेतानजीकच घटना घडल्याने बारकू रोहिले या मेंढपाळाचें मोठे नुकसान झाले. भयभीत अवस्थेतच त्यांनी माहिती देताना अत्यंत मोटा बिबट्या असल्याचे सांगितले. परिसरात बिबटे मोठ्या प्रमाणात असून पाळीव कुत्रे,जनावरे बिबट्यांच्या हल्ल्यात नाहक बळी पडत असल्याचे बारकू रोहिले,अनंत शेटे,रविंद्र कांदळकर,सोपान वागदरे या शेतकऱयांनी सांगितले. परिसरात पाळीव प्राण्यांवर वारंवार होणा-या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.
           शिरूरच्या वनपाल चारुशीला काटे यांना घटनेची माहिती देताच वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी या ठिकाणी तात्काळ भेट देत पंचनामा केला आहे. शासन नियमानुसार या शेतकऱ्यास वनविभागामार्फत योग्य ती नुकसान भरपाई मिळेल असे वनपाल चारुशीला काटे यांनी सांगितले. तर या ठिकाणी पिंजरा लावण्याची परीसरातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता तात्काळ पिंजरा लावण्याचे आश्वासन वन विभागाच्या वतीने देण्यात आले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *