हृदय द्रावक घटना ; रस्त्याअभावी आदिवासी महिलेला बाळंतपणासाठी झोळीतुन जावे लागले 

552
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या तळ्याची वाडी येथे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या आदिवासी वाडीतील एका महिलेला बाळंतपणासाठी चक्क झोळी करून मुरबाड येथे आणावे लागल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रकला रघुनाथ झुगरे असे या महिलेचे नाव असून, या महिलेला 17 जुलै रोजी झोळी करून ८ किमी अंतरावर मुरबाड येथे आणले होते. उशीर झाल्यामुळे बाळंतपण एका खाजगी हॉस्पिटलमध्ये सिझर शस्त्रक्रिया द्वारे करण्यात आले. त्यासाठी 30,000 रुपये कर्ज काढुन खर्च करण्याची वेळ कुटुंबियांवर आली.शस्रक्रिया झाल्यानंतर टाके काढण्यासाठी काल बुधवारी ता. 29 जुलै रोजी झोळीत बसवून पुन्हा मुरबाड येथे यावे लागले.
  उन्हाळा -पावसाळा आम्हाला तीन किलोमीटर जंगलातून पायी प्रवास करावा लागतो आजारी माणूस असो किंवा बाळंतपणासाठी जाणारी महिला त्यांना डोली करूनच न्यावे लागते कधी कधी महिलांची प्रसूती रस्त्यातच होते. या बाबत अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पक्का रस्ता करण्याची मागणी केली आहे. पण कोणी लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया अनंता विठ्ठल झुगरे या ग्रामस्थानी दिली.    
       मुरबाड जवळील मानिवली ग्रामपंचायत हद्दीतील ही वाडी आहे. तीनही दिशांना बारवी धरणाच्या पाण्याचा वेढा तर चौथ्या बाजूला जंगल. जंगलातील दगड धोंडे, कच्चा रस्ता त्यात चिखलामुळे वाहनांची वाहतूक होत नाही. मुरबाड, वेहेऱ्याची वाडी, वडाची वाडी, मानिवली या गावांना जोडणारा रस्ता असून. या रस्त्यावर खाजगी रिक्षा जात असतात, परंतु रस्ता खराब असल्याने वाहतूक करणे हि अवघड आहे. तसेच यावेळी वडाची वाडी जवळ उतरून सोबत असलेले सामान डोक्यावरून घेऊन 3 किमी पर्यंत चालत जावे लागते. आजारी व्यक्ती, गरोदर महिला यांना दवाखान्यात झोळीतून घेऊन जावे लागते. रात्री अपरात्री कधीही ! अशा यातना सहन करत हे आदिवासी तेथे रहात आहेत.  बारवी धरणाची उंची वाढविल्या मुळे मागच्या वर्षी पासून पावसाळ्यात तळ्याची वाडी येथील ग्रामस्थांना हा त्रास सहन करावा लागत आहे. मंडळाचे कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे यांनी बाबतीत बोलताना सांगितले की, ” बारवी धरणाच्या पाण्यामुळे तळ्याची वाडी येथे जाणारा पारंपारिक स्त्याची दुरावस्था झाल्याने नवीन रस्ता तयार करण्यासाठी अद्याप कोणतीही उपाय योजना केलेली नाही.”  तर तळ्याची वाडीकडे जाणारा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याने त्याबाबत रस्ते विभागाचे उपअभियंता यांच्याशी बोलून कार्यवाही करतो असे मुरबाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रमेश अवचार यांनी सांगितले. आदिवासी लोकांची सोय करावी म्हणून श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेत्या इंदवी तुळपुळे यांनी बारवी धरणाची उंची वाढविल्या मुळे जीवन जगणे असाह्य झालेल्या मुरबाड तालुक्यातील कोळे वडखळ व तळ्याची वाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने जुन महिन्यात हायकोर्टात  ‘रिट’ याचिका दाखल केली होती. पण ही याचिका जनहित याचिका म्हणून मुख्यन्यायाधिश यांचे कडे वर्ग करण्यात आल्याचे व त्यावर शुक्रवारी 31 जुलै रोजी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे तुळपुळे यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *