धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय पातळीवरती हालचाली सुरू 

349
घोडेगाव, ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : आंबेगाव तालुक्यात माळीण सारखी पुनरावृत्ती परत होऊ नये यासाठी धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय पातळीवरती हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या बेंढारवाडी, काळवाडी व मेघोली या गावांची नव्याने पुनर्वसन करावयाच्या जमिनीची मोजणी पुर्ण झाली असून उर्वरित गावांच्या पुनर्वसनासाठी जागामालकांची हमीपत्रे घेऊन मोजणी अहवाल लगेच सादर करण्याच्या सुचना भूमिअभिलेख कार्यालयास देण्यात आल्या आहे. यामुळे गेली पाच वर्षापासून रखडलेला धोकादायक गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरीची बेंढारवाडी, माळीणची पसारवाडी, फुलवडे येथील भगतवाडी, मेघाली तर जांभोरी गावची काळवाडी नं. १ व २ ही दुर्गम व डोंगराच्या पायथ्याशी असणारी गावे भूस्खलन व दरडींमुळे वसतिस्थानाच्या दृष्टीने धोकादायक झाली आहेत. गेल्या चार वर्षांपासून येथे दरडी कोसळणे, जमिनीला भेगा पडणे, जमीन सरकणे यांसारखे प्रकार घडू लागले आहेत. माळीणची घटना घडल्यानंतर या भागातील धोकादायक गावांचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये डोंगर पायथ्याशी वसलेली ही गावे भूस्खलनाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असल्याचे लक्षात आले आहे. दोन वर्षापूर्वी बेंढारवाडी येथे मोठया प्रमाणात भूस्खलन होऊन दरड कोसळल्याने या धोकादायक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष व सध्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही या घटनेची दखल घेत पुनर्वसनाबाबत तालुक्यातील सर्व विभागांची एकत्र बैठक घेऊन आढावा घेण्याच्या सूचना प्रषासनाला दिल्या होत्या. त्यानंतर पुनर्वसनाच्या कामांची गती थांबली होती.
मात्र सत्तेत येताच वळसे पाटील यांनी पुन्हा धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठीच्या कामाला गती दिली. असून ग्रामस्थांनी सादर केलेल्या हमीपत्रानुसार उपलब्ध जागेची मोजणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार आंबेगाव व भूमिअभिलेख कार्यालयास दिल्या आहेत. त्यानुसार उपलब्ध जमिनींचे मोजणी करण्याचे काम सध्या सुरू असून बेंढारवाडी, काळवाडी व मेघोली येथील जमिनी मोजण्याचे काम पूर्ण झाले आहे. पसारवाडी व भगतवाडी या गावांच्या पुनर्वसनासाठी जागामालकांचे हमीपत्र प्राप्त होताच या जमिनींचीही तातडीने मोजणी करण्यात येणार आहे. धोकादायक गावांच्या पुनर्वसनांतर्गत पोखरीची बेंढारवाडी येथील ५६ घरे, काळवाडी नं. १ येथील ३२ घरे, काळवाडी नं. २ येथील २४ घरे, मेघोली येथील १६ घरे, भगतवाडी येथील १४ घरे, पसारवाडी येथील ३० घरे यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या गावांना उपलब्ध झालेल्या जागेची मोजणी करणे, जीएसआयच्या रिपोर्टनुसार जागा योग्य असल्याची खात्री करणे, मुळ मालकाला अनेक अडचणी असल्यामुळे धोकादायक गावांच्या पुनर्वसित गावठाणांसाठी योग्य जागेचे संपादन करणे हे एक प्रशासनापुढे मोठे आवाहन असणार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *