मातृशक्तीचा आविष्कार – भारतीय संस्कृतीचा आधार – नकोशील करूया हवीशी – डॉ.सुधा कांकरिया 

446

        शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – स्त्री भ्रुणहत्या करु नका म्हणण्यापेक्षा ‘‘स्त्री जन्माचे स्वागत करा‘‘ असा सकारात्मक विचार असणं अधिक चांगलं. पण ‘‘ स्त्री जन्माचे स्वागत करा‘‘ असं म्हणण्याची वेळच का यावी? जिच्या ठायी मातृशक्तीचा आविष्कार आहे. वात्सल्याचे अमृत आहे, निर्मितीची क्षमता आहे. दैवी सामर्थ्याचे प्रतिबिंब जिच्या ह्दयात आहे तिच आपल्याला आज नकोशी झाली आहे. आपल्याला माया-वात्सल्य प्रेम पाहिजे, स्नेह पाहिजे, सेवा पाहिजे, पण हे सगळं देणारी आई नको, बहिण नको,? वहिनी नको? आजी नको? गर्भात तिचा अंश आला रे आला की तो कसा घालविता येईल याचाच ङ्गक्त विचार! डॉक्टरांकडे जायचं सोनोग्राङ्गी करुन घ्यायची, कायद्याचे बंधन असून सुध्दा डॉक्टरांनी ती करायची आणि मग लगेच गर्भपात! कधी संपणार हे द्रुष्टचक्र?

आजची चिमुकली उद्याची आई आहे. उद्याची आई जर जन्माला आली नाही तर मुलगा किंवा मुलगी कुणी तरी निर्माण होईल का? माणुसकी जिवंत राहिलं का? मग ज्या जगात माणूस नाही, माणुसकी नाही ते जग तरी शाबुत राहिलं का? नाही मित्रांनो नाही, हे जग आई विना, तिच्या वात्सल्याविना ओकंबोकं होईल,खिन्न सुन्न, रिकामं होईल. प्रेमाचा दुष्काळ पडेल जगाच वाळवंट  होईल हो, आता तरी आपण सावरलं पाहिजे, स्त्री जन्माचे स्वागत मनापासून केले पाहिजे.

स्त्रीभु्रणहत्या होण्याची कारणे-

मुलगाच हवा हा अट्टहास,मुलीला दुय्यम वागणूक,महिलांमध्ये असणारी आर्थिक,सामाजिक शारीरीक असुरक्षितता, हुंडा पध्दती, मुलगी अविवाहित राहिल्यास कुटुंबाला कलंक आहे अशी भावना,गर्भलिंग निदानाची सहज परवडण्याजोगी उपलब्धता, वैद्यकिय क्षेत्रातील ढासाळलेली नैतिकता, काही राज्यांमध्ये असणारे ‘‘ दोन अपत्ये‘‘ धोरण आणि महिलांचे बाजारीकरण. (वस्तू म्हणून) मी नेहमी म्हणते कि, कलयुगाचा या वादळवार्‍यात स्त्रीत्वाची ही चिमुकली ज्योत विझु पहात आहे ती विझू नये म्हणून तिला दोन हातांच्या संरक्षणाची गरज आहे. एक हात हवा आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा आणि दुसरा हात हवा आहे कायद्याच्या कडक अंमलबजावणीचा !

सोनोग्राफीचा शाप-

जिथे जिथे सोनोग्राफी सेंटर्स अधिक आहेत तिथे तिथे स्त्रीभु्रणहत्येचे प्रमाण अधिक आहे असे अहवाल सांगतो. नक्कीच डॉक्टरांची जबाबदारी अधिक आहे. रुग्ण डॉक्टरांकडे येतो, त्याची डॉक्टरांवर श्रध्दा असते, प्रसंगी तो डॉक्टरांना देवाच्या ठिकाणी पाहतो, डॉक्टरांनी पेशंटला लिंग परिक्षण करणे कसं चुकीचे आहे हे समजावून सांगितले पाहिजे. गर्भपाताचे धोके,स्त्री जन्माचे महत्व पटवून दिले पाहिजे, लिंग परिक्षण करणे पुर्णत: थांबविले पाहिजे आज वरदान असलेली ही सोनोग्राफी  मशिन शाप ठरत आहे आणि डॉक्टरामधील देवपणही हरवत चालले आहे.

मुलगाच हवा हा अट्टहास-

समाजामध्ये दोन मोठे गैरसमज आहेत. एक म्हणजे की ‘‘ मुलगा हाच वंशाचा दिवा आहे अन् मुलगी पराया धन‘‘ मुलाला वंशाचा दिवा का म्हणतात? मुलगा शिकतो,तो कमावतो, म्हातारपणाची काठी होतो व शेवटी अग्नी देतांना मुलगाच लागतो म्हणून तो वंशाचा दिवा आहे. असा गैरसमज समाजाच्या मनात खोलवर ठसला आहे. पण विचार करा कि आज मुलगा शिकतो तर मुलगीही शिकते उलट सगळ्याच आघाडीवर ती अधिक गुणवत्तेने पुढे गेलेली दिसते. विद्यापीठात, शाळेत सगळीकडे मुलीच पहिल्या आलेल्या दिसतात. अगदी ग्रामीण भागातही घरचे सगळे काम करुन, कष्ट करुन अर्धपोटी राहुन,प्रतिकुल परिस्थितीतही मुलीनींच बाजी मारलेली दिसते.

मुलगा कमावतो,मुलगीही कमावते आज ती इंजिनियर,डॉक्टर ,पोलिस,प्रोफेसर,ऑफिसर शास्त्रज्ञ,वैज्ञानिक,वकील,वगैरे वगैरे सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेली दिसते. ती ही पुष्कळ कमावते हे करीत असतांना घरचे व्यवस्थापन,घराचे घरपणही ती टिकवते. आज सरपंचापासून राष्ट्रपती पर्यतची सगळी जबाबदारी ती यशस्वीरीत्या पार पाडतांना दिसत आहे.

म्हातारपणाची काठी कोण होतं?

मुलगा? छे छे ! नाही तर एवढे वृध्दाश्रम निर्माण झाले असते का ? मुलगी जीव लावते, सांभाळते,काळजी घेते, देखभाल करते, हवं नको ते पाहते, म्हातारपणाची काठी तिचं असते. अग्नी देण्याचे काम मुलगा करतो पण वेळ आलीच तर स्त्रीपण काही मागे राहत नाही. त्या काळात सावित्रीबाई ङ्गुले नी ही अग्नी दिला होता. आज आपण आजुबाजुला पाहिले तर एका आईने, लेकीने, सुनेने, बहिणीने अग्नी दिलेली अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात.एवढं सगळं विस्ताराने सांगण्याची खरं तर गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत पण त्याची उजळणी करणं,आपल्या सानिध्यात आलेल्या व्यक्तींना हे सगळं समजावून सांगणं हेही महत्वाच आहेच ना?

समाजातील दुसरा मोठा गैरसमज म्हणजे कुटुंबात मुलाचा जन्म झाला नाही तर दोष आईलाच दिला जातो. हे किती चुकीचे आहे हे पटवून दिले पाहिजे. आईकडे असे दोन गुणसुत्रे तर वडीलांकडे XY असे दोन गुणसुत्रे असतात (आई=XX-,वडील=XY) आईकडून X वडिलांकडून Y मिळाला, तर XY होऊन मुलगा जन्माला येतो, व आईकडून X वडिलांकडून X मिळाला तरXX होऊन मुलीचा जन्म होतो. मुलगा जन्माला येण्यासाठी वडिलांकडून Y मिळायला हवा ना? मग मुलगा जन्माला आला नाही तर दोष कोणाचा ?  मुलगा किंवा मुलगी

शब्दांकन – डॉ.सुधा कांकरिया ( बेटी बचाव चळवळीच्या राष्ट्रीय प्रणेत्या), अहमदनगर  




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *