वडनेर खुर्द ते जांबुत रस्त्याच्या दुरुस्तीस मुहूर्त कधी ? दळणवळणास अडथळा – ग्रामस्थांना धुळीचा त्रास

944
               शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या बेट भागातून वडनेर खुर्द ते जांबुत या डांबरी रस्त्याची मागील १ वर्षांपासून दुरुस्तीच होत नसल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीस मुहूर्त कधी? मिळणार असा संतप्त सवाल वडनेर खुर्द येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. दुरुस्ती अभावी रस्त्यावरून जाणार्या वाहनांच्या फुपाट्याने गावात धुळीचे साम्राज्य पसरले असून दळणवळणास ही अडथळा होत आहे. नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करत या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास तात्काळ सुरुवात करावी अशी मागणी साई क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रम निचित,सामाजिक कार्यकर्ते विनायक चौधरी,नवनाथ निचित,ग्रामपंचायत सदस्य अनिल वाजे,शिल्पा निचित,नवनाथ निचित व ग्रामस्थांनी सा.सामाजशिलशी बोलताना केली आहे.
              याबाबत वडनेर खुर्द ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2020 मध्ये सुरू झालेले वडनेर जांबूत या 5 किमी रस्त्याचे काम अजूनही सुरू झालेले नाही. वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे संपूर्ण गावात धुळच धूळ होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन् मुळे काम बंद झाल्यानंतर आजतागायत कामाला मुहूर्त मिळाला नसून ठेकेदाराने काम सुरू करण्यात वेळकाढूपणा चालवला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हा रस्ता दुरुस्तीसाठी बराच लांब डांबरी रस्ता खोदून त्यात खडी आणि मुरूम भरला आहे परंतु तेथून पुढे काम बंद करण्यात आले असून या अपूर्ण कामामुळे संपूर्ण गावात धुळीचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत आहे. अपूर्ण अवस्थेत असलेल्या रस्त्यावरील खडी गाडीच्या टायर खालून उडून किरकोळ अपघात देखील घडले आहेत. तसेच मोटारसायकली घसरुन पडण्याचे देखील प्रकार घडले आहेत. आणि आता शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली असून जर एखादा मोठा अपघात घडला तर याची जबाबदारी कुणाची ? असा प्रश्न येथील सामान्य जनतेतून विचारला जात आहे.तर या अपूर्ण रस्त्याच्या कामाबाबत या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांना विचारले असता या कामासाठी निधीच उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली. जर निधीच नसेल तर हा अपूर्ण रस्ता पूर्ण होणार कधी? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *