अध्यापनाचे कामकाज सुरु ; मात्र कोरोनाचे भय कायम – प्राचार्य रामदास थिटे

429

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : ९ वी ते १२ वी वर्गांना प्रत्यक्ष अध्यापनाचे कामकाज सुरु झाले आहे. सद्य स्थितीत ५ वी ते १२ वी वर्ग प्रत्यक्षरित्या सुरु आहेत. सुरुवातीला २०% उपस्थितीने सुरु झालेले वर्ग आता १०० टक्के उपस्थितीत सुरु झाले आहेत. मात्र ‘ भय इथले संपत नाही ‘ याप्रमाणे तोंडावर मास्क, सोशल डिस्टंस आणि शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना अत्यल्प प्रतिसाद अशी स्थिती असल्याचे प्राचार्यरामदास थिटे यांनी समाजशील शी बोलताना सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणले, ” वास्तविक मार्गदर्शन आणि ज्ञानसंपादन हे वैयक्तीक पातळीवर घडत असते. शिक्षणांत विचारांचे आदान-प्रदान ही एक शक्ती आहे. प्रत्यक्ष भाव-भावना आणि विचारसंपन्न आशय व तंत्रज्ञानाची रुजवणूक करताना प्रत्यक्ष विद्यार्थी सहभाग कमीच दिसतो. एकूणच अध्यापन – अध्ययन ही प्रक्रीया एकांगीच वाटते. ज्ञान देणे ही एक दृष्टी आहे. प्रत्यक्ष अनुभव आणि कृती याव्दारे संकल्पना दृढ होतात. मैदानावर एकत्र येणे, प्रयोग शाळेत प्रायोगीक कृती करणे आणि मनोरंजक खेळांव्दारे शिकण्यात चैतन्य येणे या बाबींपासून शिक्षण प्रक्रीया दूरच आहे.शिकविलेले आकलन आणि ग्रहण होणे महत्वाचे आहे. विषयांतील क्रमान्वित अध्ययन दैनंदिन अध्यापनात शक्य होते मात्र दिवसाआड शालेय उपस्थितीमुळे हे शिक्षण मानसशास्त्र आकारास येताना दिसत नाही. तथापी भाषा निहाय संदर्भ, विज्ञान – गणितातील सूत्रे, व्याख्या, सामाजिक शास्त्रातील संकल्पना तंत्रज्ञानाच्या वाटेने आशय व तंत्रज्ञाना सह डिजीटल माध्यमांव्दारे वर्गातच प्रभावीपणे शिकविण्याचे कार्य पार पडते आहे. दिवसाआड ऑफ लाइन शिकविल्या नंतर ऑनलाईन शिकविण्यातील तोच तो पणा रंजक वाटत नाही. शिक्षकांची दुहेरी कसरत सुरुच आहे. कोठे इंटरनेट कनेक्टीव्हीटीचा संपर्क हा अडथळा ठरतो आहे. अशाही परिस्थितीत शिक्षक आपले कार्य पार पाडत आहेत. वर्ग आणि विद्येची मंदिरे सुसज्ज झाली आहेत. मंदिरातील विद्यार्थी श्रोता मात्र शांतच दिसतो आहे. अल्पावधीतच हे चित्र बदलेल असा आशावाद आहे. पुन्हा एकदा गुणवत्ता आणि चैतन्याचा बहर येईल व शिक्षण विकासाचे नवे पर्व आकारास येईल अशी खात्री आहे.”




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *