अनेक वर्ष प्रलंबित बारवी प्रकल्प पीडित तळ्याची वाडी येथे रस्ते, पाणी सुविधा होणार ; ठाणे जिल्हा परिषदेकडून 68 लाख निधी मंजूर 

320
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : अनेक वर्षे रस्त्या पासून वंचित असलेल्या बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेल्या तळ्याची वाडी येथील आदिवासींना अखेर रस्ता मंजूर झाला आहे. तीनही बाजूला बारवी धरणाचे पाणी व एका बाजुला जंगल यामुळे तळ्याची वाडी येथे जाण्यास रस्ताच नसल्याने एका महिलेला प्रसूतीसाठी झोळी मधून आणावे लागले होते. या घटनेची दखल घेत समाजशील ने बातमी प्रसिद्ध केली होती. असुविधानाचा पाठपुरावा केल्यावर ठाणे जिल्हा परिषदे मार्फत 68 लाख रुपये खर्चून तळ्याची वाडीसाठी रस्ता मंजूर करण्यात आला आहे. या परिसरातील कुंभाई वाडी, तळ्याची खालची वाडी व वरची वाडी अशा तीन आदिवासी वस्त्यांना पावसाळा येण्यापूर्वी रस्ता उपलब्ध होण्यासाठी त्याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले. या ठिकाणी पिण्याचे पाण्याची योजना सुद्धा मंजूर करण्यात आली आहे.
बारवी धरण बाधित गाव म्हणून गावाचे पुनर्वसन करावे यासह विविध मागण्यांसाठी तळ्याची वाडी येथील ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात श्रमिक मुक्ती संघटने मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ठाणे जिल्हाधिकारी यांनी एमआयडीसीच्या सहकार्याने किंवा सहकार्याशिवाय तळयाचीवाडी येथील ग्रामस्थांसाठी पिण्याचे पाणी आणि वाहतुकीची अबाधित व्यवस्था करावी असे आदेश ऑगस्ट 2020 महिन्यात औद्योगिक महामंडळ व जिल्हाधिकारी प्रशंसानास दिले होते. तळ्याची वाडी येथील ग्रामस्थ पद्माकर झुगरे यानीआम्हाला केवळ रस्ता नको तर आम्ही बारवी धरण बाधित असल्याने आमचे पुनर्वसन केले पाहिजे, पुनर्वसन होईपर्यंत कच्चा रस्ता उपलब्ध केला तरी चालेल अशी मागणी केली होती. या मागणी नंतर  बुधवारी शासकीय अधिकारी आले. त्यानंतर त्यांनी जबाब घेतले, त्यावेळी सुद्धा आम्हाला सध्या कच्चा रस्ता उपलब्ध केला तरी चालेल पण पुनर्वसन करा असा जबाब दिला आहे.
  श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेत्या इंदवी तीळपुळे  यांनी बारवी धरणाचे पाणी गावच्या तीनही बाजूला पसरले आहे. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांनी केले पाहिजे, परंतु आदिवासींनी वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने आम्ही तळ्याची वाडी व कोळे गावा साठी जनहित याचिका दाखल केली असल्याचे सांगितले.  सुनावणी दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी व एम आय डी सी एकमेकावर जबाबदारी ढकलत होते. त्यावेळी न्यायालयाने या ग्रामस्थांना तातडीने रस्ता व शुद्ध पाणी पुरविण्याचे आदेश दिले आहेत. आम्हाला केवळ रस्ता व पाणी नको योग्य पुनर्वसन करावे अशी मागणी कायम असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
 या बाबत तुकाराम जंगम अभियंता ठाणे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मुरबाड यांनी स्वतः तळ्याची वाडी येथील आदिवासींना मुरबाड शहरात येण्यासाठी रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून तेथे फिरून माहिती करून घेतली. रस्ता चांगला व्हावा यासाठी सरंक्षक भीती, आवश्यक तेथे मोऱ्या बांधणे असा सर्व अभ्यास केला आहे. त्यांना चांगला रस्ता मिळावा म्हणून मेहनत घेत असल्याचे सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *