शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात गव्हाची काढणी सुरु – यंत्राद्वारेच केला जातोय गहू – उत्पादन मिळतेय ही ब-यापैकी 

664
            शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – सततचे बदलते हवामान व अवकाळीच्या तडाख्याचा सामना करीत तयार झालेल्या गहू पिकाची काढणी सध्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सूरु असून या भागात उत्तर भारतातून आलेल्या गहू काढणी व तयार करणाऱ्या यंत्राच्या साहाय्यानेच शेतकरी झटपट गहू तयार करून घेत असल्याची माहिती शेतकरी शाम शेटे,छबन रोहिले,बबन गावडे यांनी सा. समाजशिलशी बोलताना दिली.
             तयार झालेले गहू पीक यंत्राद्वारे गहू तयार करण्याकडेच शेतकऱ्यांचा कल असून एकरी अडीच ते तीन हजार रुपये खर्च येत असल्याचे व फक्त अर्धा तासातच यंत्राद्वारे थेट गहूच तयार होत असल्याचे महेश रोहिले यांनी सांगितले. गहू काढणी यंत्रे येण्या अगोदर मजुरांच्या साहाय्याने गहू कापणी,झोडणी,वा-यावर गव्हाची उफणणी व त्यानंतर गहू तयार होत असे यात किमान आठ ते दहा दिवस जात असत परंतु आता या परिसरात गहू काढणी हंगाम सुरु होताच हार्वेस्टर यंत्रे सहज उपलब्ध होत असल्याने एक एकर गहू मात्र एका तासातच तयार होत असल्याने शेतकऱयांना गहू तयार करणे सोपे होत असल्याचे शाम शेटे म्हणाले.
               गव्हाचे चांगले बियाणे,शेतीची मशागत,वेळोवेळी खते,खाते,खुरपणी,औषध फवारणी केलेले गव्हाचे पीक जोमदार निघत असून चांगली झाड असलेल्या गव्हाचे एकरी ८ ते ९ क्विंटल उत्पादन निघत असल्याचे छबुकाका रोहिले यांनी सांगितले.तयार झालेला गहू पुन्हा वाळवून शेतकरी वर्षभारासाठी पुरेल या करीता पोत्यात भरण्या अगोदर गव्हाचे किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून योग्य ती खबरदारी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात मागील वर्षभरात शेतीत जीवापाड मेहनत घेत विविध उत्पादने घेऊन ही सातत्याने पडलेल्या बाजारभाव व पिकांवर वारंवार होणाऱ्या किडी प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक रहात नव्हतें. पण ज्यांनी गव्हाचे उत्पादन घेतले त्यांना बर्यापैकी उत्पन्न मिळाल्याने अशा शेतकऱ्यांमधून समाधान होत असल्याचे आवडा कांदळकर यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *