मुरबाड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीकडे नगरपंचायत चे दुर्लक्ष

344

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी मुळे शहरात गर्दी होत असून कोरोना नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे. शहरातील मुख्य प्रवेशद्वारापासून काँक्रीट रस्त्याच्या मध्यभागी पेव्हर ब्लॉक खचल्याने गटाराचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहन चालक आडवी तिडवी वाहन करून मार्ग काढतात. तर रहदारीला अडथळे ठरणारे फक्त नऊ धोकादायक पोल काढून उर्वरित पोल तसेच असल्याने शहरातील वाहतूक नियोजन ठप्प झाले आहे. नगरपंचायत ने नो पार्किंग, सम विषम पार्किंगचे  फलक लावलेत मात्र अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. शहरात येणाऱ्या व्यापारी वर्गाच्या मोठ्या ट्रान्सपोर्टच्या ट्रक कुठेही थांबविल्या जातात. तर शहरात येणारी वाहने मुख्य रस्त्यावर कुठेही उभी करत असल्याने नगरपंचायत पूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. शहरातील फुटपाथ वर ही अतिक्रमण होत असल्याने पायी चालणाऱ्याना वाट मिळेल तसे चालावे लागत आहे. मुरबाड नगरपंचायत मध्ये सध्या प्रशासकीय कारभार सुरू असल्याने या बाबी ची तक्रार लोक लोकप्रतिनिधीकडे न करता नगरपंचायत कडे करताना दिसत आहेत.  मात्र कोरोना काळात वाहतूक कोंडी व गर्दी रोखण्यासाठी नगरपंचायत अपयशी ठरत आहे शहरात अनेक दुकानदार कोरना नियमाची पायमल्ली करताना दिसत आहे. तर कधी तरी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करताना दिसत असल्याने कारवाईची भीती नागरिक वर्गात दिसत नसल्याने कोरोना नियमाचा फज्जा उडाला आहे. नगरपंचायत याकडे लक्ष देईल का? असा प्रश्न मुरबाड कर करत आहेत. शहरात व ग्रामीण भागात कोरोना बधितांची संख्या रोज दिसून येत असून आरोग्य विभाग व नगरपंचायत ने वेळीच लक्ष न दिल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते अशी चर्चा होताना दिसत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *