गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून लवकरच हैदराबाद, इंदोर विमानसेवा 

293

      गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून लवकरच हैदराबाद, इंदोर विमानसेवा 

        देवरी,गोंदिया : (प्रतिनिधी,शैलेश राजनकर)  – डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिऐशन ने गोंदिया जिल्ह्यातील  बिरसी विमानतळाची तपासणी केल्यावर विमानतळाचा  परवाना तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच 11 मे रोजी जिल्हाधिकार्‍यांना विमानतळावर आवश्यक सुविधा व प्रक्रिया पूर्ण करण्याचे पत्र दिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तराच्या बिरसी येथील विमानतळाचा प्रवासी वाहतुकीचा मार्ग त्यामुळे आता सूकर होणार आहे. गोंदिया मार्गे हैदराबाद, इंदोर विमानसेवा जूनपासून सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बिग चार्टर एअर लाइन्स (फ्लाय बिग) या कंपनीने बिरसी विमानतळावरून मध्य प्रदेशातील इंदोर-गोंदिया-हैदराबाद आणि हैदराबाद ते गोंदिया-इंदोर येथे प्रवासी विमानसेवेला हिरवी झेंडी दाखविली आहे.यामुळे गोंदिया जिल्हा आता लवकरच चार्टर विमानसेवेने जोडला जाणार आहे.
विशेष म्हणजे तत्कालीन केंद्रीय विमान वाहतुक मंत्री प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदियाच्या बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार करण्यात आले आहे. याठिकाणी शासकीय व अशासकीय वैमानिक प्रशिक्षण सध्या सुरु असून रात्रीला सुध्दा विमान उतरण्याची व धावण्याची सोय धावपट्टीवर करण्यात आली आहे.त्यांच्या कार्यकाळात जरी विमान वाहतुक सुरु होऊ शकले नसले तरी त्यांनी त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले होते.त्यातच विद्यमान खासदार सुनिल मेंढे यांनी या विमानतळावरुन प्रवासी व वाणिज्यिक विमान धावावे यासाठी सातत्याने बैठका घेत दिल्लीपर्यंत पुढाकार घेतला होता हे सुध्दा महत्वाचे आहे.
गोंदियाजवळील बिरसी येथे इंग्रजकालीन विमानतळाला आंतरराष्ट्रीयस्तराचे विमानतळ बनविण्यासाठी माजी विमान वाहतूक केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाने याठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र सुरु झाले असून येथून निघालेले अनेक पायलट देशात सेवा देत आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळणार आहे. मात्र या विमानतळावरुन प्रवासी व माल वाहतूकसेवेची प्रतिक्षा जिल्हावासीयांना होती. यासंदर्भात खा. पटेल यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी, केंद्र सरकारने सुरु केलेल्या लहान व मध्यम शहरातील विमानतळावरुन क्षेत्रीय विमान प्रवासीसेवेतंर्गत बिरसी विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *