पिंपरखेडला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद – नागरिकांतुन सुटकेचा निश्वास व्यक्त 

342
पिंपरखेडला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद – नागरिकांतुन सुटकेचा निश्वास व्यक्त 

पिंपरखेड,शिरूर : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड – भागडी रस्त्यालगत सैद जाधव मळ्यात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना सोमवारी दि.१२ रात्री घडली.पिंजरा लावल्याच्या दुसऱ्या दिवशीच बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

        पिंपरखेड येथील सैद जाधव मळ्यात व परिसरात बिबट्याचा वावर व वास्तव्य होते. बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढी गंभीर झाल्याची घटना घडली होती.त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते.याबाबत दामोदर दाभाडे यांनी तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली होती. तसेच सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी वनविभागाला पिंजरा लावण्याचे पत्र दिले होते.वनविभागाने तत्काळ दखल घेऊन या ठिकाणी पिंजरा लावला. वनविभागाने रविवारी सकाळी लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी रात्री साडे आठ वाजता बिबट्या अडकला.बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच मंगळवारी सकाळी वनविभागाच्या वनरक्षक सविता चव्हाण,वनकर्मचारी विठ्ठल भुजबळ, महेंद्र दाते यांनी घटनास्थळी धाव घेतली व प्रसंगावधान राखून पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात केली. अंदाजे दहा वर्ष वयाचा बिबट्या असल्याचे वनरक्षक सविता चव्हाण यांनी सांगितले. पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *