खोट्या गुन्हया प्रकरणी 19 जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; 17 वर्षाच्या संघर्षाला यश

795

 गुन्ह्यात शासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्याचा समावेश

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील देहरी ग्रामपंचायतच्या मालकीचे गौण खनिज चोरी प्रकरणी 2004 साली भाजपा नेते प्रा.लियाकत शेख व हैबत देशमुख यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती. मात्र हा गुन्हा खोटा असून यात नाहक गोवल्याचे सांगत प्रा . लियाकत शेख यांनी मुरबाड न्यायालयात या खोट्या गुन्ह्यात गोवल्याबाबत दाद मागितली होती. गेली 17 वर्ष हा न्यायालयीन लढा सुरू होता. अखेर हा गुन्हा खोटा असल्याचा निकाल मिळाला. त्यामुळे हा खोटा गुन्हा दाखल करण्यात सहभागी असलेल्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रा.शेख यांनी मुरबाड न्यायालयात केली होती. या न्यायालयीन मागणी नुसार मुरबाड दिवाणी न्यायालयाने संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुरबाड पोलीसाना दिले होते. मात्र या आदेशाची अमलबजावणी होत नसल्याने पुन्हा न्यायासाठी शेख यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. अखेर गुन्हा दाखल झाल्याने उपोषण रद्द करण्यात आले.

 या खोट्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तत्कालीन तहसीलदार अंजली भोसले, तत्कालीन पो.नि.बाळकृष्ण पाटील, तत्कालीन पो.उप निरी.चांगदेव चव्हाण, तत्कालीन गटविकास अधिकारी देवरे, तत्कालीन पाटबंधारे उपअभियंता थोरात, शाखा अभियंता शिलवंत, ग्रामसेवक साहेबा राठोड या अधिकारी वर्गासोबत दिपक खाटेघरे, चंद्रकांत बोष्टे, सुखदेव चिरोटे, खलील जुआरी या राजकिय पदाधिकाऱ्यासह इतरांविरोधात मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याने खोट्या गुन्ह्यात अडकविल्या बाबत न्याय मागणाऱ्या प्रा.लियाकत शेख याना 17 वर्ष संघर्ष करून न्याय मिळाला असला तरी यामुळे मुरबाड तालुक्यात राजकीय व शासकीय चर्चेला उधाण आले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *