शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्ग ; कामाचा दर्जा निकृष्ट

483

संबंधित रस्ता एमएसआरडीसी’कडे सोपवून मोठी चूक – केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : शहापूर – मुरबाड – खोपोली महामार्ग वादाच्या भोवऱ्यात सापडला असून टक्केवारी या कामाचा दर्जा सुमार असून एमएस आर डी सी कडे काम देऊन मोठी चूक झाल्याचे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री व खासदार कपिल पाटील यांनी नुकत्याच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगून नाराजी व्यक्त केली. हा महामार्ग वाढते अपघात व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे चर्चेत असल्याने शहापूर-मुरबाड-खोपोली रस्त्याचे तूर्त सहा मीटर रुंदीपर्यंतच काम करण्यात यावे. उर्वरित रस्त्याचे रुंदीकरण भूसंपादनानंतर करावे, असे निर्देश केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले आहेत. संबंधित रस्ता एमएसआरडीसी’कडे सोपवून मोठी चूक केली असल्याचे मंत्री कपिल पाटील यांच्याबरोबरच किसन कथोरे यांनी नमूद करीत राज्य सरकारवर निशाण साधला.  शहापूर-मुरबाड-खोपोली राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची दुरवस्था, अपूर्ण कामे आणि भूसंपादनासंदर्भात केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आमदार किसन कथोरे, दौलत दरोडा, माजी आमदार गोटीराम पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती वंदना भांडे, दशरथ तिवरे आदींची उपस्थिती होती.
शहापूर-मुरबाड-खोपोली रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. मात्र, त्याचे काम केंद्र सरकारने एमएसआरडीसीकडे सोपविल्याने मोठी चूक झाली. या कामाचा दर्जा निकृष्ट असून, एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येत नाही. अनेक अपघात होत आहेत याबाबत, ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत, अशी टीका राज्यमंत्री कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी केली. या रस्त्याचे काम काही ठिकाणी 30 मीटर करण्यात येत आहे. मात्र, रस्त्याच्या मालकीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुरावेच नाहीत. 1977 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एवढी जागा असणे शक्य नव्हते. त्यामुळे सध्या केवळ 6 मीटर रूंद रस्त्याचे काम पूर्ण करावे. उर्वरित रस्त्याचे रुंदीकरण शेतकऱ्यांना पैसे दिल्यानंतर जमिनी ताब्यात घेऊन करावे, असे निर्देश राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले. ते एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहेत. मूळ जमीन मालक व सध्या जमिनीवर बांधकाम केलेल्या नागरिकांमध्ये भरपाईच्या सुरू असलेल्या वादावर स्थानिक नेत्यांनी समन्वय साधून मार्ग काढावा, असे आवाहनही राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले. शहापूर-मुरबाड रस्त्याच्या काम तीन वर्षांपासून सुरू असून, ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. यापूर्वी अवघ्या अर्ध्या तासात शहापूरहून मुरबाडला जाता येत होते. आता तब्बल एक तासाचा कालावधी लागतो, याबद्दल ज्येष्ठ नेते दशरथ तिवरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नव्या रस्त्यापेक्षा जुना रस्ताच बरा होता, अशी खंत व्यक्त केली. तर पवाळे फाटा ते कुडवली रस्त्याला पर्यायी रस्ता न केल्यामुळे ग्रामस्थांचा मार्ग बंद झाला आहे, याकडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी लक्ष वेधले. तर रस्त्याच्या कामाच्या टोलवाटोलवीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. शहापूर-मुरबाड-खोपोली रस्त्याच्या कामात आतापर्यंत तीन ठेकेदार झाले आहेत. या रस्त्याच्या मूळ ठेकेदाराने 3 टक्के कमिशनने दुसऱ्या ठेकेदाराकडे काम सोपविले. तर दुसऱ्या ठेकेदाराने आणखी 11 टक्के कमिशनने तिसऱ्या ठेकेदाराला परस्पर काम सोपविले. या गोंधळात रस्त्याची तऱ्हा झाला. या प्रकाराला जबाबदार कोण? असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना केला. पर्यायी रस्ता नसताना परस्पर सर्व पूल व मोऱ्या तोडण्याची परवानगी कोणी दिली? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *