कवठे येमाईत कोरोनाचा पुन्हा विस्फोट – रुग्ण  संख्या ४९ –  नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करा – ग्रामपंचायत,आरोग्य विभागाचे आवाहन  

1549

            शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील लोकसंख्येने मोठे गाव असलेल्या कवठे येमाई गावात कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला असून आज रोजी ४९ रुग्ण ऍक्टिव्ह असल्याने  नागरिकांनी अत्यंत दक्षता घ्यावी कोरोना प्रतिबंधात्मक नियम व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सरपंच मंगलताई सांडभोर,उपसरपंच निखिल घोडे,कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नामदेव पानगे,ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड यांनी केले आहे.

             मोठ्या लोकसंख्येचे गाव असलेल्या कवठे येमाईत कोरोनाचे सध्या ४९ रुग्ण एक्टीव्ह असून गावात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होताना दिसून येत आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभाग नागरिकांना वेळोवेळी कोरोना प्रतिबंधात्मक सूचना,उपाययोजना व नागरिकांनी घ्यावयाची दक्षता याबाबत सात्यत्याने जनजागृती करीत असताना काही बेफिकीर नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत.
शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरण,रिमझिम पाऊस या वातावरणीय बदलामुळे सर्दी,खोकला,घसा खवखवणे,पेशी कमी-जास्त होणे अशा प्रकारचे रुग्ण आढळून येत असल्याची तसेच कोरोनाची रुग्ण संख्या ही वाढली असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळाली आहे.गावात लग्नसमारंभ,दशक्रिया विधी दरम्यान शासनाने दिलेली मर्यादा सोडून मोठ्या प्रमाणत गर्दी केली होत असल्याचे व त्यातून संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सरपंच मंगलताई सांडभोर यांनी सांगितले.
             दरम्यान गावात वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. २५ पासून पुढील आठ दिवस गावात कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याची चर्चा असून शासनाने दिलेल्या कोरोना संदर्भातील सूचनांचे पालन न करणाऱ्या, विनाकारण गर्दी करणाऱ्या लोकांवर पोलीस यंत्रणा व प्रशासनाने कडक कारवाई केल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तसेच ज्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्या घरातील सदस्यांनी किमान १२ दिवस तरी इतर कोणाच्याच संपर्कात येऊ नये असे कळकळीचे आवाहान ही सरपंच मंगलताई रामदास सांडभोर व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. कोरोनाचा गाव परिसरात होणारा वाढत आलेख पाहता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. मास्क नियमित वापरा,सॅनिटायझरचा वापर करा,हात वारंवार स्वच्छ धुवा,व परिसरात संशयित रुग्ण आढळल्यास आरोग्य विभागाला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन डॉ.नामदेव पानगे,ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. याबाबत स्थानिक आरोग्य विभाग ही सतर्क झाला असून आरोग्य कर्मचारी,आशा सेविका घरोघरी भेटी देत प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक देण्यात येत असणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत.दरम्यान शेजारील सविंदणेत ११ तर कान्हूर मेसाईत २ रुग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती ही आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *