आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध एस.आय.टी. मार्फत चौकशी करा – मनसेची मागणी

470

शिरूर, पुणे (समाजशील वृत्तसेवा) : आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध एस.आय.टी. मार्फत चौकशी करावी अशी मागणी मनसे शिरूर शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांना निवेदनाद्वारे केली आहे. शिरूर येथील काही लोकांना एक पत्र आलेले होते. सदर पत्रात शिरुर हवेलीचे आमदार अशोक रावसाहेब पवार यांची व त्यांच्या पत्नी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता अशोक पवार यांची व शिरुर शहरातील सामाजिक व विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची त्या निनावी पत्रात बदनामी करुन शिरुर हवेलीचे आमदार पवार यांना जिवे मारण्याची गर्भित धमकी दिलेली होती. त्यामुळे शिरुर हवेलीचे आमदार अशोक रावसाहेब पवार यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. तसेच सदर पत्रात काही नगरसेवक व इतर काही मान्यवर लोकांची देखील बदनामी केलेली आहे. तर त्या पत्रात माझ्यासारख्या अनेक छोट्या मोठ्या कार्यकत्यांची देखील सदर पत्राच्या माध्यमातून बदनामी केलेली असल्यामुळे शिरुर शहरात दहशतीचे वातावरण झाले असल्याचे मनसे शिरूर शहर अध्यक्ष अविनाश घोगरे यांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे. तर  दि. १८ ऑक्टोबर रोजी शिरुर शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी शिरुर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढून व निवेदन देवून सदर निनावी पत्राची चौकशी करण्याची मागणी केलेली होती. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सदर प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना पोलीस खात्याला दिलेल्या होत्या. तर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात इसमांची एस.आय.टी.मार्फत चौकशी करुन ते कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचा तपास करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे व सदर कामी केलेल्या तपासाची माहिती शिरुर शहरातील नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाने आंदोलन करु असे मनसेने निवेदनाद्वारे सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *